ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 01:20 AM2021-05-15T01:20:40+5:302021-05-15T01:21:00+5:30
दिंडोरी तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी असलेल्या सुमारे ३७ लाख रुपये शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी : तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी असलेल्या सुमारे ३७ लाख रुपये शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशेवाडी ग्रामपंचायतीत १५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ दरम्यान विविध विकासकामांसाठी आलेला शासकीय निधी त्यासाठी न वापरता ग्रामसेवक दिलीप वामनराव मोहिते (रा.साकोरे मिग), सरपंच श्रीमती जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच श्रीमती सुनीता संजय बोडके (रा. आशेवाडी) या तिघांनी त्यांचे ओळखीच्या चार इसमांचे नावे धनादेश,आरटीजीएसच्या माध्यमातून ३७ लाख ३० हजार ८९ रुपये अदा केली. त्यानंतर ती रक्कम पुन्हा त्या इसमांचे खात्यातून काढून घेत तिघांनी संगनमत करत अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती दिंडोरीचे विस्ताराधिकारी आण्णा किसन गोपाळ यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.