मालेगावच्या दोन खासगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:48+5:302021-06-10T04:10:48+5:30
गेल्या ७ जून रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा ...
गेल्या ७ जून रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम महापालिकेला दिला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने रुग्णालयाची पाहणी व कागदपत्रांची पडताळणी केली. यात प्रथमदर्शनी रुग्णालय संचालक सुराणा यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महापालिकेचे उपआयुक्त राजू खैरनार यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाने रजिस्ट्रेशन करण्यासाठी महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०२० रोजी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्यांनी अग्निशमन विभागाचा दाखला जोडला होता. अग्निशमन अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०२० रोजी दाखला दिल्याचे नमूद केले होते. मात्र, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडून अग्निशमन ना हरकत प्रस्ताव सादर केला नसल्याने त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नसताना रुग्णालयाच्या संचालकांनी बनावट दाखल्यावर सिक्स सिग्मा व सनराइज रुग्णालय असे नाव टाकून ना हरकत दाखला तयार करून महापालिकेची फसवणूक केली. तसेच सनराइज रुग्णालय व सिक्स सिग्मा रुग्णालय इमारतीच्या मालमत्ता कर आकारणीसंदर्भात ७ जानेवारी २०२० रोजी मिळकत मालकाशी केलेल्या भाडे करारनाम्याची छायांकित प्रत, प्रभाग क्रमांक १ चे अधिकारी सुनील खडके यांच्याकडे १९ मार्च २०२१ रोजी सादर केली होती. या करारनाम्यात परवाना शुल्क ३० हजार, मेन्टेनन्स शुल्क ४० हजार असे एकूण ७० हजार रुपये दर्शविण्यात आले आहे. मात्र, करार हा ११ महिन्यांसाठी दर्शविण्यात आला होता. सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या संचालकांकडून महापालिकेच्या विभागाकडे रजिस्ट्रेशन होऊन दाखला मिळण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांत परवाना शुल्क १ लाख ११ हजार रुपये दर्शविण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागातील करारनामा व प्रभाग १ कार्यालयात सादर केलेला करारनामा यात तफावत व दिशाभूल करणारी माहिती पुरवून महापालिकेची वार्षिक २ लाख ३० हजार २५६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास छावणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले करीत आहेत.
इन्फो
आरोग्य अधिकाऱ्यांना हटवले
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनपा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. हेमंत गढरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून अवाजवी बिले आकारली जात होती. तसेच सिक्स सिग्मा व सनराइज रुग्णालयाच्या प्रकरणामुळे महापालिका कारवाई करत नसल्यामुळे लोकप्रतिधींचा रोष वाढला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकरे यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महापालिका वर्तुळात राजकीय दबावामुळे डॉ. ठाकरे यांच्यावर पदभार सोडण्याची नामुष्की ओढावली आहे.