धक्कादायक! पोटच्या मुलीचा देहविक्रयासाठी सौदा; बापाला दहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:56 PM2022-01-18T14:56:48+5:302022-01-18T15:00:08+5:30
नाशिक : पंचवटीतील पेठरोड भागात राहणाऱ्या एका बापाने सुमारे चौदा वर्षांपूर्वी पोटच्या अल्पवयीन मुलीचा देहविक्रयाच्या बाजारात सौदा केला होता. ...
नाशिक : पंचवटीतील पेठरोड भागात राहणाऱ्या एका बापाने सुमारे चौदा वर्षांपूर्वी पोटच्या अल्पवयीन मुलीचा देहविक्रयाच्या बाजारात सौदा केला होता. या गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. १७) झालेल्या अंतिम सुनावणीत आरोपी बापाला १० वर्षांची सक्तमजुरी व एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.
पेठरोड भागातील फुलेनगर परिसरात राहणारा आरोपी दत्तात्रय उर्फ दत्तू चव्हाण (४५) याने पीडित अल्पवयीन मुलीचा पुण्यात वेश्याव्यवसायासाठी सौदा केला होता. या गुन्ह्यात पंचवटी पोलीस ठाण्यात दत्तू याने स्वतः फिर्यादी होऊन मुलीला देहविक्रयासाठी नेण्यात आल्याची फिर्याद दिली होती. पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक धनराज दायमा यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता पीडितेने दिलेल्या जबाबावरून फिर्यादी आरोपी चव्हाण हाच म्होरक्या असल्याचे समोर आले. दायमा यांनी त्यास बेड्या ठोकल्या व त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७२ व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये २१ मार्च २००७ रोजी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करत सबळ परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयापुढे सादर केले.
या खटल्याची सुनावणी २००८ मध्ये सुरू झाली. जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार दायमा यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी दत्तू चव्हाण यास दोषी धरले. सरकारी पक्षाकडून ॲड. भानुप्रिया नितीन पेटकर यांनी कामकाज पाहिले. पीडिता अंतिम सुनावणीत साक्ष देण्यासाठी गैरहजर राहिली. गुन्ह्यातील इतर दोन्ही संशयित महिलांविरुद्ध सबळ पुरावे समोर न आल्याने न्यायालयाने त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.