Crime News : जमिनीच्या वादावरुन तलाठ्याला कार्यालयात कोंडले, पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 08:25 AM2022-02-09T08:25:42+5:302022-02-09T08:28:00+5:30

तलाठी गणेश कदम यांच्याकडे शहा गावचा अतिरिक्त पदभार आहे. सोमवारी दुपारी ते शहा येथील तलाठी कार्यालयात काम करीत होते.

Crime News : Talathi locked in office over land dispute, released by police in nashik vavi | Crime News : जमिनीच्या वादावरुन तलाठ्याला कार्यालयात कोंडले, पोलिसांनी केली सुटका

Crime News : जमिनीच्या वादावरुन तलाठ्याला कार्यालयात कोंडले, पोलिसांनी केली सुटका

googlenewsNext

नाशिक/सिन्नर : तालुक्यातील शहा येथे कार्यरत असलेले तलाठी गणेश बाबूराव कदम यांना सोमवारी (दि. ७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत कार्यालयात कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित अजिज हवालदार सय्यद याच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी गणेश कदम यांच्याकडे शहा गावचा अतिरिक्त पदभार आहे. सोमवारी दुपारी ते शहा येथील तलाठी कार्यालयात काम करीत होते. त्यांच्यासमवेत दहीवाडीचे तलाठी संतोष भगवान बलखंडे, परिविक्षाधीन तलाठी सुफियान इकबाल शेख काम करत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहा गावातील अजिज हवालदार सय्यद हा कार्यालयात आला. माझ्या जमिनीची नोंद कशी झाली अशी विचारणा करत तलाठी कदम यांच्यावर पैसे घेऊन नोंद केल्याचा आरोप करू लागला. त्यावेळी कदम यांनी सय्यद यास तुम्हाला हवी ती माहिती देतो, लेखी अर्ज करा, असे सांगितले. त्यावर सय्यद याने तलाठी कदम यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तलाठी कदम यांनी खरेदीखतानुसार नोंद केल्याचे सय्यद यास सांगूनही त्याने काहीएक न जुमानता तलाठी कदम यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तुम्हाला बघून घेतो, तुम्ही इथून कसे बाहेर पडता ते बघतो, असे म्हणून दमबाजी केली. त्यावेळी तलाठी कार्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक व तलाठी यांना कार्यालयात कोंडून दरवाजा बाहेरून बंद केला. तलाठी कदम यांनी घटनेची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. तहसीलदार कोताडे यांनी त्यांना धीर देत पोलीस पाठवून देतो असे सांगितले व तत्काळ वावी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वावी पोलिसांनी शहा येथे जात तलाठी कार्यालयात कोंडलेल्या तलाठी कदम यांच्यासह सर्वांची सुटका केली.

सोमठाणे येथील तलाठी गणेश बाबूराव कदम (वय २९, रा. दैठाणा खु, ता. परतूर, जि. जालना, हल्ली रा. शिवाजीनगर, सिन्नर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी संशयित अजित हवालदार सय्यद, रा. शहा याच्याविरुद्ध दमदाटी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही. के. सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: Crime News : Talathi locked in office over land dispute, released by police in nashik vavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.