विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:40 PM2022-03-31T15:40:13+5:302022-03-31T15:42:12+5:30
नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; पेट्रोल पंप चालकांकडून संताप व्यक्त
नाशिक : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम अत्यंत कठोर पद्धतीने राबविली जाणार असून विनाहेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालक - मालकांवर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे.
पोलीस आयुक्तांच्या या इशाऱ्यावर पेट्रोल पंपचालकांनी संताप व्यक्त केला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पेट्रोल पंपचालकांची आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. दुचाकी चालकासह त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेटचा वापर बंधनकारक राहणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही पाण्डेय यांनी सांगितले.
नाशिकमध्ये मागील वर्षीपासून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’, नो हेल्मेट, नो को-ऑपरेशन, हेल्मेट नाही, समुपदेशनाला हजेरी बंधनकारक या पद्धतीने पोलीस आयुक्तालयाने हेल्मेटची सवय आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना समुपदेशनानंतर परीक्षाही घेतली जाऊ लागली आणि ई - चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. १ डिसेंबर २०२१ पर्यंत २,८७९ दुचाकी चालक व सहप्रवाशांचे समुपदेशन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. जानेवारीपासून परीक्षेसोबत दंडात्मक कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली होती.
यानंतर मागील महिन्यापासून या मोहिमेत काहीशी शिथिलता आली. परीक्षा व समुपदेशन थांबवून केवळ दंड वसुलीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. गुढीपाडव्यापासून पुन्हा हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कठोर व प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय पाण्डेय यांनी घेतला आहे.
पंप धोकादायक ठरविणार
विना हेल्मेट कोणी दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यास आल्यास त्याला आयुक्तालयाच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालक - मालकांनी पेट्रोलचा पुरवठा करु नये, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी म्हटले आहे. गुन्हे दाखल झाल्यावरही पंपावरील चित्र बदलले नाही, तर मालकाला ‘तुमचा पेट्रोल पंप धोकादायक आहे, असे का ठरवू नये’ अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही पाण्डेय म्हणाले.