शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:12+5:302021-04-27T04:16:12+5:30
--- नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून दैनंदिन गुन्ह्यांचे प्रमाण अगदी शून्यावर आल्याचे दिसते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य ...
---
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून दैनंदिन गुन्ह्यांचे प्रमाण अगदी शून्यावर आल्याचे दिसते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि रस्तोरस्ती चोख गस्त दिसून येत असल्याने गुन्हेगार भूमिगत झाल्याचे बोलले जात आहे.
घरफोडी, मारहाण, जबरी चोरी, वाहनचोरी, विनयभंग यांसारख्या विविध गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहेत. शहरातील १३ पोलीस ठाणे आणि एक सायबर पोलीस ठाणे अशा एकूण १४ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे घडण्याचे प्रमाण घटले आहे. दोन दिवसांपूर्वी इंदिरानगरच्या हद्दीत घडलेली सोनसाखळी चोरीचा जबरी चोरीची घटना आणि सोमवारी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली दुचाकीचोरीची घटना वगळता, अन्य कुठल्याही पोलीस ठाण्यात गंभीर किंवा किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद होऊ शकली नाही.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात झालेली वाढ आणि त्यामुळे व्यक्त केली जाणारी भीती, यामुळे शहरातील सर्वच भागांतील वर्दळ कमी झाली आहे, यामुळे गुन्हेगारीच्या घटनाही कमी झाल्याचे दिसते. मागील वर्षीही असाच काहीसा अनुभव नाशिककरांना थोड्या-फार फरकाने अनुभवायास आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत कडक निर्बंधांच्या यंदाच्या काळात आकस्मिक मृत्यूची नोंद अधिक असल्याचे लक्षात येते. एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत शहर व परिसरात गंभीर गुन्हे घडत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून यांसारख्या गुन्ह्याचा आलेख कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
-----इन्फो-
‘मोक्का’चा धसका
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भद्रकाली आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी घडलेल्या खून अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या क्रूर घटनेची गंभीरपणे दखल घेत, सराईत गुन्हेगारांच्या दोन मोठ्या टोळ्यांविरुद्ध थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. या आठवडाभरात झालेल्या या धडक कारवाईनंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी धसका घेतला आहे.