गुन्हा दाखल : जिल्हा व सत्र न्यायालयातून खटल्याची मुळ फिर्याद गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 06:46 PM2018-07-12T18:46:15+5:302018-07-12T18:50:36+5:30
मिसर यांनी सदर बाब न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधिश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंत्याच्या लाच प्रकरणाच्या खटल्याच्या कामकाजाची फाईल न्यायालयाकडे सुपुर्द करताना विशेष सरकारी वकिल यांनी ती चाळली असता त्यामध्ये मुळ फिर्यादचे दस्तऐवज गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याऐवजी बनावट कागदपत्र अज्ञातांनी फेरफार क रुन फाईलमध्ये ठेवल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेत अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे.
बांधकाम विभागाचे निलंबित अभियंता सतीश मधुकर चिखलीकर यांच्यासह शाखा अभियंता जगदीश वाघ यांना २०१३ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्या निवासस्थानांची झडती घेतली असता कोट्यवधींचे घबाड हाती आले होते. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केले होते. सरकार पक्षाकडून अॅड. अजय मिसर कामकाज चालवित होते. दरम्यान, या खटल्यात संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मिसर यांनी या खटल्याची फाईल न्यायालयाकडे सुपुर्द करण्यापुर्वी पडताळून बघितली असता त्यामध्ये फिर्यादी इरफान यासीन शेख याची स्वाक्षरी असलेले दस्तऐवज गहाळ असल्याचे निदर्शनास आले. तसेच पंचाची साक्ष असलेल्या दस्तऐवजांवर कुठल्याहप्रकारच्या स्वाक्षऱ्या नसल्याचेही आढळले. त्यामुळे मिसर यांनी सदर बाब न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधिश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा व प्रधान न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायालयीन कर्मचारी दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक व्ही.ए.शेळके करीत आहेत.
मुळ तक्रारीच्या मजकुरातही फेरफार
मुळ तक्रारीमधील मजकू रातही फे रफार करुन मजकूर बदलण्याचाही प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच तक्रारीच्या सही-शिक्का असलेली नकल प्राप्तीसाठी करण्यात आलेल्या अर्जाच्या नोंदवहीतही व्हाईटनरचा वापर करत खाडाखोड केल्याचे पुढे आले आहे. जिल्हा व प्रधान न्यायालयाने ही नोंदवही जप्त केली आहे. याप्रकरणात संशयाची सुई न्यायालयीन कर्मचारी वर्गासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस आणि आरोपीवरही आहे.