गुन्हेगारीत वाढ : ‘लॉकडाऊन’ शिथिलतेनंतर ९ प्राणघातक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:15 PM2020-06-15T17:15:51+5:302020-06-15T17:16:14+5:30
नाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलिस वाहनांच्या उद्घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलिस गस्तीचे प्रमाणही कमी झाले;
नाशिक : शहरात एप्रिलमध्ये लॉकडाऊन काळात तीन प्राणघातक हल्ले झाले तर लॉकडाऊन शिथिलतेनंतर मे महिन्यात या प्रकाराचे नऊ गंभीर गुन्हे घडले. शहरात एप्रिलमध्ये दोनदा जबरी चोरीचा गुन्हा घडला तर मे महिन्यात १० जबरी चोरीचे गुन्हे घडले. घरफोड्यांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये आणि अनलॉकमध्ये सारखेच राहिल्याचे दिसते. तसेच अपहरणाचे प्रकार आणि रस्ते अपघाताच्या दुर्घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसते.
चालू महिन्याच्या पंधरवड्यातसुध्दा हाणामारी, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, वाहनचोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच वाहनांची जाळपोळ, तोडफोड, दंगलीसारखे गुन्हेसुध्दा घडले आहेत. जाखोरीमध्ये तर पतीने पत्नीची कोयत्याने हत्त्या केल्याचे उघडकीस आले.
नाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलिस वाहनांच्या उद्घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलिस गस्तीचे प्रमाणही कमी झाले; यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. २४ तास शहरातील रस्त्यांवर पोलीस दिसत होते. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पोलीस नजरेस पडत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसला होता.