संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १५१ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:50 PM2020-03-26T21:50:55+5:302020-03-26T23:03:35+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरिक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरिक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणारे व येणारे तसेच नियमित वैद्यकीय सेवेसाठी जाणाºया नागरिकांसाठी कोरोना मदत कक्षाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात संचारबंदी लागू असून त्यादृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपाययोजनांच्या दृष्टीने बैठक घेतली. त्यात संचारबंदी स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात न घेता जे अकारण रस्त्यावर फिरत आहेत, अशा उत्साही नागरिकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत भादंविक १८८ (१) प्रमाणे १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, संचारबंदी कालावधीत जीवनावश्यक सेवा आणि अन्य सेवा देण्यासाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध १२ व्हॉट्सअॅप क्रमांक घोषित करण्यात आले असून, कोरोना.नाशिकसिटीपोलीस.ग्जीओव्ही.इन या संकेतस्थळाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक वस्तू नागरिकांच्या घराच्या परिसरातच उपलब्ध होतील, यादृष्टीने पूर्तता करण्याबाबत नांगरे पाटील यांनी सूचना केल्या आहेत.
नागरिकांना आवश्यक कामासाठी अथवा अत्यावश्यक सेवेतील कामसाठी बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दिनांक, वेळ, दररोज जायचे-यायचे असेल तर त्याच्या वेळा त्यासंबंधीच्या कारणांचा स्पष्ट उल्लेख करावा, डायलेसीस किंवा अन्य वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडायचे असेल तर त्याबाबतच्या व्यक्तींची माहिती व्हॉट्सअॅपवर पाठवावी, असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले आहे.
संचारबंदीमुळे सध्या होस्टेलमध्ये राहणाºया विद्यार्थ्यांच्या भोजनाची गैरसोय होत आहे. मात्र त्यांना पार्सलमार्फत जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याबाबतदेखील पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी सूचना केल्या आहेत.