देवयानी फरांदे यांच्यासह दाेनशे माेर्चेकऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:14 AM2020-12-24T04:14:36+5:302020-12-24T04:14:36+5:30
सादिकनगर येथील एका पीडित विवाहितेसोबत चुकीचे वर्तन केल्याच्या संशयावरून संशयित इरफान व त्याच्या साथीदारांनी दवाखान्यात बळजबरीने प्रवेश करत धुडगूस ...
सादिकनगर येथील एका पीडित विवाहितेसोबत चुकीचे वर्तन केल्याच्या संशयावरून संशयित इरफान व त्याच्या साथीदारांनी दवाखान्यात बळजबरीने प्रवेश करत धुडगूस घातला होता. यावेळी दवाखान्यातील साहित्यांची तोडफोड करत डॉक्टर मुस्ताक शेख यांना मारहाण करण्यात आली होती. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित इरफानसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच पीडितेच्या फिर्यादीनुसार विनयभंगाच्या गुन्ह्यात डॉक्टर शेखलाही ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी संशयित इरफान यास अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे कर्मचाऱ्यांसह सादिकनगरमध्ये गेले असता पोलिसांना पाहून इरफानने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पळत असताना पायाला दगड लागल्याने तो रस्त्यावर पडला आणि पोलिसांनी तत्काळ त्याला धरून वाहनात डांबले. यानंतर परिसरातील महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते. दरम्यान, पोलिसांनी फरांदे व पंधरा ते वीस महिला माेर्चेकऱ्यांसह सुमारे दोनशे लोकांवर कलम-१८८नुसार गुन्हा दाखल केला आहे.
--इन्फो--
जलद प्रतिसाद पथकाला पाचारण
परिसरातील सुमारे दोनशेहून अधिक महिला, पुरुषांनी संशयित आरोपी इरफानला पोलिसांनी अटक का केली, असा सवाल उपस्थित करत पोलीस ठाण्यावर मोर्चा आणला. मोर्चात विशेष म्हणजे आमदार देवयानी फरांदे या अग्रभागी होत्या. यावेळी पोलीस ठाण्याने तातडीने माेर्चेकऱ्यांची गर्दी पांगविण्यासाठी आयुक्तालयाशी संपर्क साधत जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) पाचारण केले. यावेळी पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे जमावाला ‘तुम्ही कायद्याचे उल्लंघन करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा इशारा दिला. तसेच माेर्चेकऱ्यांच्या शंकांचे माईनकर यांनी निरसन करत संशयित डॉक्टर शेख यालाही अटक करण्यात आल्याचे सांगितले.