वडाळ्यात सहा घरमालकांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:01 AM2019-09-17T01:01:17+5:302019-09-17T01:01:34+5:30
भाडेकरू ठेवताना त्यांची कुठलीही माहिती न घेता व पोलिसांना त्याविषयी काहीही न सांगता माहिती दडवून ठेवणाऱ्या वडाळागाव परिसरातील सहा घरमालकांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
इंदिरानगर : भाडेकरू ठेवताना त्यांची कुठलीही माहिती न घेता व पोलिसांना त्याविषयी काहीही न सांगता माहिती दडवून ठेवणाऱ्या वडाळागाव परिसरातील सहा घरमालकांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
वडाळागाव परिसरात सदनिका व घरे सर्रासपणे भाडेतत्त्वावर दिली जातात. जणू एकप्रकारे हा एक व्यवसायच वडाळागावात सुरू झाला आहे. भाडेतत्त्वावर घर देणे-घेणेच्या व्यवहारात मध्यस्थांकडून चक्क ‘मलिदा’ही लाटला जातो. घरमालकाला भाडेकरू आणि भाडेकरूला घर मिळवून देताना मध्यस्थ मंडळी भाडेकरू ठेवताना घ्यावयाची काळजी आणि पोलीस प्रशासनाचा नियमाविषयी मालक-भाडेकरू दोघांना अनभिज्ञ ठेवताना दिसून येत आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे चुकीचे असून, मालकदेखील जवळच्या पोलीस ठाण्यात भाडेकरूंविषयीची माहिती अथवा भाडेतत्त्वाच्या कराराची सत्यप्रत सादर करत नसल्याचे समोर आले. इंदिरानगर पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घेत भाडेकरूंची माहिती दडविणाºया मालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
वडाळागावातील मदिनानगर परिसरात भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी घराचा मूळ मालक वसीम मुस्तफा कोकणी (३७, रा. कोकणीपुरा), रोशन अली सय्यद (३९, रा.पखालरोड), रियाज अय्युब शेख (४४, रा. पखालरोड) अन्वर लाला शेख, मिसबाउद्दीन मेहंदी हसन खान, समशुद्दीन पापामिया शेख, या सहा घरमालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आबा पाटील, उपनिरीक्षक जावेद शेख, रामचंद्र जाधव, सचिन सोनवणे, भगवान शिंदे, रियाज शेख, राजेश टोपले यांनी मोहीम हाती घेतली आहे.