दाजीबा वीराच्या मिरवणूकप्रसंगी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 01:16 AM2022-03-21T01:16:40+5:302022-03-21T01:16:56+5:30
शहरातून धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी (दि.१८) पोलीस परवानगीने दाजीबा वीराची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीप्रसंगी पोलिसांनी घालून दिलेल्या विविध अटी-शर्थींचे पालन न केल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. आयोजक विनोद हिरामण बेळगावकर (रा.मिरजकर गल्ली, बुधवार पेठ) यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातून धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी (दि.१८) पोलीस परवानगीने दाजीबा वीराची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीप्रसंगी पोलिसांनी घालून दिलेल्या विविध अटी-शर्थींचे पालन न केल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. आयोजक विनोद हिरामण बेळगावकर (रा.मिरजकर गल्ली, बुधवार पेठ) यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारंपरिक प्रथेनुसार दरवर्षी जुने नाशिकमधून बुधवारपेठ येथून वाजत गाजत दाजीबा बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली होती. तत्पूर्वी पोलीस आयुक्तालयाकडे आयोजकांकडून मिरवणुकीच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. विविध अटी-शर्थींच्या अधीन राहून पोलीस आयुक्तालयाकडून आयोजक बेळगावकर यांना मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या तालासुरात वाजत गाजत मिरवणूक गोदाकाठावर संध्याकाळी उशिरा पोहोचली. या मिरवणुकीत पोलिसांच्या अटी-शर्थींचा भंग करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच गौरी पटांगणावर मिरवणुकीत सहभागी संशयित यश राजेंद्र जाधव (२०,रा.गजराज चौक, जुने नाशिक), अमित प्रजापती (२२,रा.शिवाजी चौक) या दोघांनी हातात कोयते, तलवारी बाळगून नृत्य केले. यामुळे पोलीस आयुक्तालयाकडून काढण्यात आलेल्या मनाई आदेशाचा भंग संबंधितांनी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे या दोघा युवकांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायदा व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.