२०१७च्या तुलनेत २०१८मध्ये गुन्ह्यांत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:38 AM2019-01-28T00:38:25+5:302019-01-28T00:38:53+5:30
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २०१७ व २०१८ या दोन वर्षांतील गुन्हेगारीचा तौलनिक अभ्यास करता गतवर्षी गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असून, सामाजिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़ २०१८ मधील गुन्हेगारीचा लेखाजोखा यावेळी आयुक्तांनी पत्रकारांसमोर मांडला़ २०१७च्या तुलनेत २०१८ मधील गुन्ह्यांमध्ये २०५ने वाढ झाली असली तरी खून, दरोडा, जबरी चोरी, चेनस्नॅचिंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मात्र घट झाल्याचे सिंगल यांनी सांगितले़
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २०१७ व २०१८ या दोन वर्षांतील गुन्हेगारीचा तौलनिक अभ्यास करता गतवर्षी गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असून, सामाजिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़ २०१८ मधील गुन्हेगारीचा लेखाजोखा यावेळी आयुक्तांनी पत्रकारांसमोर मांडला़ २०१७च्या तुलनेत २०१८ मधील गुन्ह्यांमध्ये २०५ने वाढ झाली असली तरी खून, दरोडा, जबरी चोरी, चेनस्नॅचिंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मात्र घट झाल्याचे सिंगल यांनी सांगितले़
पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंग, दंगल, मुलींना पळवून नेणे, विवाहिता छळ यांसारख्या सामाजिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़ २०१७ मध्ये खुनाच्या ४१ घटना घडल्या होत्या, तर २०१८ मध्ये यामध्ये ६ने घट झाली आहे़ खुनाच्या बहुतांशी घटना या आपसांतील वादातून घडलेल्या असून, भाईगिरी वा गुंडगिरीतील खुनाचे प्रमाण अत्यल्प आहे़ २०१७ मध्ये चेनस्नॅचिंगच्या घटना शंभराहून अधिक झाल्या होत्या, मात्र २०१८ मध्ये यामध्ये २५ने घट होऊन ७७ पैकी ३८ गुन्ह्यांची उकलही झाली आहे़ दुचाकी चोरीमध्येही ३३ने घट झाली असून, २०१८ मधील ४६९ पैकी १६९ दुचाक्या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत़ जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये १२ने तर अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ४४ने वाढ झाली आहे़ यामध्ये अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेल्याच्या घटना सर्वाधिक आहेत़ २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयात ३ हजार ७३५ गुन्हे दाखल झाले असून, २०१७च्या तुलनेमध्ये २०५ ने गुन्हे वाढले आहेत़ यावेळी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते़
रस्ता अपघातातील मृत्यूमध्ये वाढ
२०१८ मधील रस्ते अपघातात २०१७ च्या तुलनेत ४७ ने वाढ झाली आहे. २०९ अपघातांच्या घटनांमध्ये २१७ जणांचा मृत्यू झाला तर २०१७ मध्ये १५८ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या २१७ नागरिकांमध्ये १२६ दुचाकीस्वारांचा समावेश असून ११२ दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते़ चारचाकी अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी एकानेही सीटबेल्ट घातलेला नव्हता़ याखेरीज ५९ पादचारी, सहा सायकलस्वार, तर अन्य घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे़
दोषसिद्धीत पोलीस आयुक्तालय चतुर्थ
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते़ यानंतर न्यायालयात साक्ष, पुरावे झाल्यानंतर न्यायालय शिक्षा ठोठावते़ जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेल्या शिक्षेचे प्रमाण ५७़४२ टक्के असून सत्र न्यायालयाचे प्रमाण २९़८८ टक्के आहे़ राज्यभरातील पोलीस आयुक्तालयातील दोषसिद्धीमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाचा चतुर्थ क्रमांक आहे़