दरमहा भरणार गुन्हेगारांचा ‘मेळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:11 AM2021-06-21T04:11:54+5:302021-06-21T04:11:54+5:30
राज्य पोलीस नियमावलीनुसार गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासोबतच गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्याचेदेखील पोलिसांचे उद्दिष्ट असणे आवश्यक असल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी ...
राज्य पोलीस नियमावलीनुसार गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासोबतच गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्याचेदेखील पोलिसांचे उद्दिष्ट असणे आवश्यक असल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी ‘गुन्हेगार सुधार योजना-२०२१’ शहरातील दोन्ही परिमंडळांमध्ये दरमहा गुन्हेगारांचा मेळावा घेण्याचे आदेश काढले आहेत. याअंतर्गत सुरुवातीचे तीन महिने सलग हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यानंतर त्रैमासिक गुन्हेगारांचा मेळावा घेतला जाणार आहे. याबाबतची जबाबदारी दोन्ही परिमंडळांचे मिळून चारही विभागांच्या सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. या मेळाव्यादरम्यान मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहून गुन्हेगारांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत जाणून घेत त्यांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारीदेखील मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गुन्हेगारांना संधी दिल्यास त्यांचे वर्तन सुधारण्याची शक्यता आहे. अशा गुन्हेगारांनी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून दिल्यास त्यांना सुधारण्यासाठी वाव देत ‘खाकी’कडून एक संधी दिली जाणार आहे.