गुन्हेगार राकेश कोेष्टीची धिंड
By Admin | Published: December 21, 2016 11:07 PM2016-12-21T23:07:16+5:302016-12-21T23:07:42+5:30
सिडकोतील घराची झडती : नागरिकांमध्ये समाधान
सिडको : पंचवटी परिसरात खून करणारा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी यास आज पंचवटी पोलिसांनी अंबड पोलिसांच्या मदतीने सिडकोतील दत्त चौक परिसरात फिरवून त्याची धिंड काढण्यात आली. तसेच यावेळी त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली. अचानक पोलिसांचा ताफा पाहून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. संशयित राकेश कोष्टी हा खून करून फरार झाला होता. त्यास पंचवटी पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले, तर या गुन्ह्यातील तीन अल्पवयीन आरोपींसह सहा सराईत गुन्हेगार अजूनही फरार आहे. याबाबत तपास सुरू असताना पंचवटी व अंबड पोलिसांच्या वतीने बुधवारी कोष्टी राहत असलेल्या सिडको भागातील विजयनगर, दत्तचौक परिसरात आणून त्याची धिंड काढली. तसेच कोष्टी याच्या घराची झडती घेण्यात येऊन खुनात वापरण्यात आलेले हत्यार आहे की नाही याचा शोध पोलिसांनी घेतला. मखमलाबाद रोडवरील क्र ांतिनगर परिसरात भेळभत्त्याची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांवर २७ मे २०१५ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात वाघ यांचा मृत्यू झाला होता. भेळ विक्र ेता वाघ याच्या खुनात संशयित आरोपी म्हणून राकेश कोष्टी यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्कान्वये कारवाईदेखील केली होती; मात्र तपासात अनेक त्रुटी राहिल्याने त्यांच्यावरील मोक्का हा अपर पोलीस महासंचालकांनी हटविला आहे. राकेश कोष्टी याची धिंड अंबडचे पोलीस निरीक्षक मधुकर कड व पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. (वार्ताहर)