पंचवटीतील तडीपार गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:15 AM2018-08-26T00:15:36+5:302018-08-26T00:15:53+5:30
शहर व जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा) यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २४) पहाटे अटक केली़
नाशिक : शहर व जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा) यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २४) पहाटे अटक केली़ गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी परदेशी यास शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते़ न्यायालय वा पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी पहाटे त्यास घरातून ताब्यात घेतले़
रिक्षाच्या प्रवासात ६२ हजारांचा मुद्देमाल लांबविला
सातपूर शिंदे मळ्याजवळील रहिवासी आप्पासाहेब दिघे हे शुक्रवारी (दि़२४) कुटुंबीयांसह अशोकनगर ते ठक्कर बझार असा रिक्षाने प्रवास करीत होते़ या प्रवासादरम्यान रिक्षातील दोन संशयित महिलांनी त्यांच्या पत्नीच्या पर्समधील ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये दीड तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, २० हजार रुपयांची सोन्याची पोत, १० हजार रुपयांच्या अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व बाळ्या, दोन हजार रुपयांची एक ग्रॅम वजनाची पोत यांचा समावेश आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
लॅपटॉपची चोरी
आडगाव शिवारातील अमित सोनवणे (रा. शिवदर्शन अपार्टमेंट, जत्रा हॉटेलजवळ) यांचा २० हजार रुपयांचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप चोरट्यांनी आडगाव शिवारातील समर्थनगरमधील एका रेस्टॉरंटमधून चोरून नेला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून आडगाव परिसरात चोरीच्या प्रकार वाढल्याने भीतीचे वातावरण आहे.
दानपेट्या फोडल्या
पुणे महामार्गावरील साईशिवनगरच्या द्वारकामाई साई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ८०० रुपये व २०० रुपयांची पितळी थाळी चोरून नेली़ याबरोबरच या चोरट्यांनी डीजीपीनगरच्या टागोरनगरमधील साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून सहा हजारांची रोकड व सहा हजार रुपयांची दानपेटी असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी प्रकाश आवारे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.