गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर दिली तुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:18 AM2019-06-26T01:18:57+5:302019-06-26T01:19:25+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित अशोक दत्ता पारवे (२४) याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. पारवे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.
नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित अशोक दत्ता पारवे (२४) याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. पारवे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांकडून संशयित गुन्हेगारांना निष्काळजीपणे जिल्हा रुग्णालयात आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाच्या वाहनातून (एम.एच.१५ अे.अे.१६२) संशयित अशोक यास दोन ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी एक पोलीस कर्मचारी कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ गेला व दुसºया पोलीस शिपायाने अशोक यास रुग्णालयात नेले. यावेळी त्याची नजर चुकवून अशोक रुग्णालयाबाहेर आला. त्याने शवविच्छेदन कक्षाच्या दिशेने पळ काढला. तेथील मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे तो पाठीमागील संरक्षक भिंतीवरून उडी मारून फरार झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संशयित गुन्हेगार फरार झाल्याचे समजताच बंदोबस्तावरील पोलिसांच्या पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तत्काळ रुग्णालयाचा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली व घटनेची माहिती बिनतारी संदेश यंत्रणेवरून नियंत्रण कक्ष व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिला. अवघ्या काही मिनिटांत न्याहाळदे, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील हे रुग्णालयात दाखल झाले.
तत्काळ सर्व बीट मार्शल, पेट्रोलिंग वाहनांना सतर्कतेच्या
सूचना देत त्याचे छायाचित्र पोलिसांच्या व्हॉट््सअॅपग्रुपवर व्हायरल के ले गेले.
सरकारवाडा, मुंबईनाका पोलिसांचे गस्त पथक साध्या वेशातील पोलीस, बीट मार्शल सर्वांनी सीबीएस, पोलिसांची स्नेहबंधन पार्क वसाहत, टिळकवाडी, जुने मध्यवर्ती बसस्थानक, नवे मध्यवर्ती बसस्थानक, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान आदी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली; मात्र रात्री उशिरापर्यंत फरार अशोक पोलिसांच्या हाती लागला नाही.
पुणे येथून केली होती अटक
संशयित अशोक विरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा प्रथमदर्शनी दाखल होता. त्याने अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवून तिला पळवून नेले होते. त्याने मुलीसोबत लग्नही केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्यास पुणे येथून ताब्यात घेतले होते; मात्र तपासी पथकाच्या परिश्रमावर अखेर पाणी फिरले. वैद्यकीय तपासणीसाठी अशोकला आणले असता त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला.