गुन्हेगारांचे राजकीय ‘आश्रयदाते’ पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:57 AM2018-09-27T00:57:36+5:302018-09-27T00:58:11+5:30
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांशी हितसंबंध (आश्रयदाते)असणाऱ्या विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व लोकप्रतिनिधी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे.
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांशी हितसंबंध (आश्रयदाते)असणाऱ्या विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व लोकप्रतिनिधी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी नुकतीच सत्ताधारी पक्षाचे विद्यमान नगरसेवकास नोटीस बजावली असून, यापाठोपाठ अजूनही काही विद्यमान व माजी नगरसेवक, झेरॉक्स नगरसेवकासह पक्षाच्या आजी माजी पदाधिकाºयांनादेखील टप्प्याटप्प्याने नोटिसा बजाविण्यात येणार असल्याचे समजते.
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व परिसरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हेगारांचे आश्रयदाते असणाºयांचे सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आले असल्याचे समजते. यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत सजा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांचे राजकीय आश्रयदाते असलेले विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, झेरॉक्स नगरेसवक, नगरसेवक पुत्र, नगरसेवक पती तसेच विविध राजकीय पक्ष संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी हे पोलिसांच्या रडारवर असून, त्यांची यादी बनविण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. अंबड पोलिसांनी या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला पहिलीच नोटीस सिडकोतील भाजपाच्या विद्यमान नगरसेवकास बजावली असून, त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे फर्मान दिले असल्याचे समजते. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्का अंतर्गत, लूट, खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले गुन्हेगार हे शिक्षा भोगत असून, काहीजण जामिनावर बाहेर आले असून, त्यांना मिळणाºया राजकीय आश्रयामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे यापुढील काळात यावर लगाम बसावा यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता राहावी यासाठी पोलिसांनी निवडणुकांच्या काही महिने अगोदरपासूनच ही कारवाई सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
गंभीर कारवाई करण्यात येणार
पोलिसांच्या या मोहिमेत व तपासात ज्यांना नोटिसा बजाविलेल्या आहेत अशांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे तपासात सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.