सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 07:39 PM2019-11-02T19:39:29+5:302019-11-02T19:47:00+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मध्यरात्री गस्त घालताना आढळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकला व रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नाशिक : पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मध्यरात्री गस्त घालताना आढळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनीअटक केलेल्या उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकला व रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या सोनसाखळी आणि घरफोड्या लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या सूचनांनुसार परिसरातील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, शुक्रवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास अहमद पटेल, प्रदीप सावंत हे दोघे कर्मचारी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या पाठीमागील परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दोन संशयित आढळून आले. पोलीस कर्मचारी पटेल व सावंत यांनी संशयितांना विचारपूस करण्यासाठी थांबण्यास सांगितले, मात्र त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे पटेल आणि सावंत यांनी संशयितांचा पाठलाग करण्यास सुरुवात करून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यातील एकजण अंबडच्या चुंचाळे परिसरातील घरकुल भागात राहणारा उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकल्या (१९) असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खून, घरफोडीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याचा साथीदार सराईत रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या याच्यावरही घरफोडी, सोनसाखळी चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गस्ती पथकातील पोलीस कर्मचारी अहमद पटेल व प्रदीप सावंत या दोघांचाही पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.