अपहरण करून खंडणी मागणारे गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:06 AM2019-01-20T00:06:08+5:302019-01-20T00:07:46+5:30
शहरातील एका वयोवृद्ध इस्टेट एजंटचे दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यापोटी दोन लाख रुपये उकळणाºया चार सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या पाचपैकी काही गुन्हेगारांना यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
नाशिक : शहरातील एका वयोवृद्ध इस्टेट एजंटचे दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यापोटी दोन लाख रुपये उकळणाºया चार सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या पाचपैकी काही गुन्हेगारांना यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
शहरातील डिसूझा कॉलनीतील निर्मल भवनजवळ ६४ वर्षीय चांगदेव रामभाऊ घुमरे हे राहतात. ते स्वत: शहरात इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करतात. तीन महिन्यांपूर्वी काही इसमांनी त्यांच्या घरी जाऊन जमिनीच्या व्यवहाराची बोलणी करायची असल्याचे सांगून प्रवेश केला. त्यावर घुमरे यांनी नंतर बोलू असे सांगून त्यांना काढून दिले. त्यानंतर पुन्हा घुमरे यांना ३० आॅक्टोबर २०१८ रोजी गंगापूर रोडवरील श्री गुरुजी हॉस्पिटलजवळ बोलावून घेतले व तुम्हाला एका जमिनीच्या व्यवहारात पाच ते सहा कोटी रुपये मिळाले आहेत, त्यातील दोन कोटी रुपये द्या, अन्यथा तुम्हाला व तुमच्या मुलाला मारून टाकू, अशी धमकी देत घुमरे यांना आनंदवलीमार्गे चांदशी शिवारातील बांबू हॉटेल येथे नेले. त्यामुळे जिवाला घाबरलेल्या घुमरे यांनी दोन लाख रुपये त्यांना दिले. उर्वरित रक्कम जानेवारी महिन्यात देण्याच्या अटीवर घुमरे यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, संशयितांकडून सातत्याने मिळणाºया धमक्या पाहता, अखेर घुमरे यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडे सोपविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित पोलिसांनी संशयितांचे दूरध्वनी टॅप करून तांत्रिक सहाय्याने एकेक संशयिताला ताब्यात घेतले. त्यात सागर सुदाम दिघोळे (२८, रा. पाण्याच्या टाकीजवळ, वरचे चुंचाळे, अंबड) याच्यासह मनोज सीताराम कुंभारकर (३१, रा. चौधरी मळा, राका लॉन्सच्या मागे, पंचवटी), मनोज श्यामराव पाटील (२८, रा. मोरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी) व पंकज सुधाकर सोनवणे (२६, रा. वरचे चुंचाळे, अंबड) यांचा समावेश आहे. या संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, पैशांची मागणी करताना वापरलेले भ्रमणध्वनी असा सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या चार जणांव्यतिरिक्त त्यांचा पाचवा साथीदार सूरज ओमप्रकाश राजपूत (रा. नाशिकरोड) याचाही त्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असले तरी, सध्या तो शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर आधारवाडी कारागृहात आहे. त्याच्याही अटकेची तयारी पोलिसांनी चालविली आहे. या गुन्ह्यातील संशयित सागर दिघोळे याचा पंचवटीतील एका हत्येत सहभाग स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेचीही शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य संशयितांवरदेखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी करीत आहेत.
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
शहरातील जमिनींच्या व्यवहारांवर नजर ठेवून त्याआधारे लूटमार व खंडणी उकळणारी टोळी कार्यरत असून, घुमरे यांचे प्रकरण त्यातीलच एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी अशा प्रकारची माहिती लिक करीत असावे, अशी शंका घेतली जात आहे. असा प्रकार कोणाच्या बाबतीत घडला असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.