लोखंडी अवजारांंकडे कल वाढल्याने सुतार व्यवसायावर संकट : शेतीमशागत, पेरणीची लाकडी अवजारे हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:40+5:302021-07-05T04:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात पूर्वी शेतीची मशागत करण्यासह पेरणीसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे ही लाकडांपासून बनविली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात पूर्वी शेतीची मशागत करण्यासह पेरणीसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे ही लाकडांपासून बनविली जात होती. मात्र, विज्ञानामुळे प्रगती झाल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहे. आज बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत किंवा पेरणी करीत असले तरी, बैलांच्या साहाय्याने शेती हाकणाऱ्या शेतकऱ्यांकडील लाकडी अवजारे हद्दपार झाली असून, त्यांची जागा लोखंडी अवजारांनी घेतली आहे. यामुळे यावर अवलंबून असणारा सुतारीचा व्यवसायही बुडाल्याने त्यांच्यावर अवकळा आली आहे.
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात नवीन लाकडी अवजारे बनविण्यासाठी, तसेच जुन्या अवजारांची डागडुजी करण्यासाठी सुतारांकडे शेतकऱ्यांच्या रांगा लागत होत्या. पूर्वी धान्याच्या रूपाने व नंतर पैशांच्या रूपाने ही अवजारे बनवून मिळत असत. यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचे लाकूड आणून द्यावे लागे. यातून सुतार वखर, तिफण, कोळपे, लगड, बैलगाडी आदी अवजारे बनवून देत. मात्र, कालौघात नवनवीन उपकरणांचा शोध लागत गेला, तशी शेतकऱ्यांना लागणारी अवजारेही लोखंडापासून बनविली जाऊ लागली. लोखंडी नळ्यांपासून बनविले जाणारे वखर, तिफण, कोळपे हे वजनाने हलके, तसेच सोपे व सुटसुटीत असल्याने शेतकऱ्यांचा कल नंतर तिकडे झुकला. मात्र, याही पुढे नंतर यांत्रिक युग आल्याने ट्रॅक्टरद्वारे मशागत व पेरणीकडे शेतकरी वळले आहेत. मात्र, अजूनही कोळपणी व वखरणीसाठी बैलांचा उपयोग करावाच लागतो. मात्र, आता लाकडी अवजारे काळाच्या पडद्याआड गेली आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत व पेरणी करीत आहेत. यात वेळ व श्रम वाचतात. यंदा डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ट्रॅक्टरमालकांनी मशागतीचे दर वाढविले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, ते पुन्हा बैलांच्या साहाय्याने पेरणी करीत आहेत.
इन्फो...
सुतारांचे कामठे झाले सुने सुने...
पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सुतार कारागीर जेथे काम करीत, त्या भागाला कामठा असे म्हणत. पावसाळ्याच्या सुरुवातीला या कामठ्यांवर शेतकऱ्यांची गर्दी होत असे. कोणी नवीन अवजारे बनविण्यासाठी येत, तर कोणी वखर, तिफण, कोळप्यांच्या दांड्या बसविण्यासाठी येत. यावेळी सर्व जण सुतार कारागिरांची मनधरणी करताना दिसून येत. मात्र, लोखंडी अवजारे आल्यानंतर हळूहळू सुतारांचा व्यवसाय अडगळीत पडला. आजघडीला हे कामठे सुनेसुने झाले असून, सुतारांचा पारंपरिक व्यवसाय बुडाला आहे. पोटापाण्यासाठी त्यांना इतर व्यवसायांकडे वळावे लागले आहे.