काटवन परिसरात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:24+5:302021-07-07T04:16:24+5:30
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवन परिसराकडे पावसाने पाठ फिरवल्यानंतर पेरण्या खोळंबल्या होत्या; परंतु गेल्या आठवड्यात थोड्याफार झालेल्या पावसाच्या भरवशावर ...
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवन परिसराकडे पावसाने पाठ फिरवल्यानंतर पेरण्या खोळंबल्या होत्या; परंतु गेल्या आठवड्यात थोड्याफार झालेल्या पावसाच्या भरवशावर ओलीचा अंदाज घेत मका व बाजरी पेरणी करण्यात आली. परंतु पेरणी झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची पेरणी करण्यात येत आहे. ज्या परिसरात पाऊस झाला त्या ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. यातच पेरणी केल्यानंतर पावसाची आवश्यकता असताना पावसाने पाठ फिरवली आहे.
यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाला भिडल्या असून, पावसाची वाट बघितली जात आहे. यामध्येच लष्करी अळीची धास्ती असून, अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
प्रतिवर्षी चांगले पीकपाणी येईल या आशेवर पेरणीची कामे सुरू आहेत. अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी फक्त खरीप पेरणीचा पर्याय असल्याने पावसाळ्यात या शेतकऱ्यांचा अपेक्षा उंचावत असतात. परंतु बेभरवशाच्या पावसाने भरवसा खोटा ठरत असून, पीकपाणी येईल किंवा नाही असा कोणताही अंदाज मात्र राहिला नाही.
पावसाअभावी चिंता वाढली असून, चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.