दुबार पेरणीचे संकट टळले; बळीराजा शेतीकामात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:01 PM2020-07-08T21:01:07+5:302020-07-09T00:30:23+5:30
लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते.
लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते. त्यानुसार लखमापूर, म्हेळुसके, ओझे, दहेगाव, वागळुद, परमोरी, ओझरखेड, करंजवण, अवनखेड, कादवा म्हाळुंगी आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरीवर्गाने मशागत पूर्वकामे करून सोयाबीन, भुईमूग, भात व इतर पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने या पिकांना आधार दिला आहे. त्यामुळे आता बळीराजांची कोळपणी, निंदणी, पिकांना खत घालण्याच्या कामात लगीनघाई सुरू झाली आहे.
रब्बी हंगामात बळीराजाचे अतोनात हाल झाले होते. जी पिके घेतली, त्याला भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था ‘न घरका न घाटका’ अशी झाली होती.
परंतु या परिस्थितीचा सामना करीत त्याने खरीप हंगामासाठी उरलेल्या भांडवलावर सुरुवात केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने नजरा आकाशाकडे लागल्या
होत्या. परंतु आषाढी एकादशीनंतर पांडुरंगाला घातलेले पावसासाठीचे साकडे खरे ठरले व दुबार पेरणीचे संकट टळले. आता उगवण झालेल्या पिकाची पेरणी नंतरची कामे करण्यात शेतकरी सध्या मग्न आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसामुळे शेतीकामे जोरात सुरू आहे. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
----------------
दिवसाआड दुकाने उघडत असल्याने खतांसाठी धावपळ...
दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे दिवसाआड खतांची दुकाने उघडण्यात येतात. त्यामुळे आगाऊ नोंदणी करून खते खरेदी करावी लागतात. शेतकरीवर्गाचा वेळ वाया जात आहे. अशा अनेक संकटाचा सामना करीत बळीराजा खरीप हंगामातील पिकांवर आशा ठेवून आहे. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भर खरीप हंगामातील पिके भरून काढतील. या दृष्टीने शेतकऱ्यांकडून नियोजन आखले जात आहे.