पाणीपुरवठा योजना बंद असल्याने टंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 01:58 AM2021-04-14T01:58:32+5:302021-04-14T01:59:36+5:30
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
नाशिक : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
सदरची योजना तत्काळ सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असले तरी, सद्यस्थितीत न्यायडोंगरी या गावातील विविध नळ योजनांची उद्भव पाण्याची पातळी खालावल्याने नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नवीन योजनेत गिरणा धरण ते न्यायडोंगरी दरम्यान पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. गावात पाणीटंचाई निर्माण झालेली असून, जवळपास पंधरा हजारांहून अधिक नागरिक पाण्यापासून वंचित आहेत.
नवीन योजना लवकरात लवकर सुरू न केल्यास न्यायडोंगरी व लगतच्या पाच वाड्या, वस्त्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाई अंतर्गत खर्च वाढणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदार, ग्रामपालिका यांच्याशी समन्वय साधून पाणीपुरवठा योजना सुरू करावी.