खुसखुशीत भाष्य : ‘दिल ढूॅँढता हैं
By Admin | Published: January 24, 2015 12:04 AM2015-01-24T00:04:35+5:302015-01-24T00:05:05+5:30
’हिंदी नाट्य स्पर्धा : मुंबई महापालिकेतर्फे सादरीकरण
नाशिक : मानवी जगण्याच्या दृष्टिकोनावर खुसखुशीतपणे भाष्य करीत ‘दिल ढूॅँढता हैं’ या नाटकाने रसिकांना मनमुराद हसवले आणि विचारप्रवृत्तही केले.
महाराष्ट्र हौशी हिंदी नाट्यमहोत्सवात शुक्रवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग झाला. डॉ. आनंद राजाध्यक्ष हे ६५ वर्षीय गृहस्थ ‘अपनालय’ हे वृद्धांचे रुग्णालय चालवत असतात. तेथे कालिंदी महापात्रा ही जीवन रसरशीतपणे जगणारी महिला त्यांच्याकडे रुग्ण म्हणून दाखल होते. सतत उत्साहाने भारलेल्या कालिंदी यांच्या जगण्याच्या तऱ्हा आगळ्या असतात. त्यातून रुग्णालयात वेगळ्या स्वरूपाचा तणाव निर्माण होतो. या घडामोडींतून नाटकातील पात्रांच्या आयुष्याच्या वेगळ्याच पैलूंचे दर्शन घडते, असा नाटकाचा आशय होता.
नाटकाची निर्मिती शुभदा कामथे यांची होती. प्रकाश गोडबोले लिखित व अरुण कदम दिग्दर्शित या नाटकात स्वत: कदम यांच्यासह संपदा सोनटक्के, चिंतू वालकर, जनार्दन कदम, अर्जुन खामकर, वामन वाघमारे, शरद नखाते, सूचिता कर्णिक, रोहन कर्णिक, तेजल वायंगणकर आदिंनी भूमिका साकारल्या. संजय तोडणकर (प्रकाशयोजना), अरुण कानविंदे (पार्श्वसंगीत), ओंकार पेडणेकर (रंगभूषा), तर वंदना-सुलक्षणा यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली. हरीश जामटे यांनी सूत्रधाराचे काम पाहिले. दरम्यान, सकाळचे नियोजित ‘स्लाइस आॅफ द लाइफ’ हे नाटक काही कारणास्तव होऊ शकले नाही. उद्या (दि. २४) सकाळी ११.३० वाजता होणारे ‘चिंधी बाजार’ हे नाटक रद्द झाले असून, सायंकाळी ७ वाजता ‘गोविंदा’ हे नाटक सादर होईल. (प्रतिनिधी)