पक्षीय प्राबल्य ठरणार निर्णायक
By admin | Published: February 16, 2017 01:33 AM2017-02-16T01:33:16+5:302017-02-16T01:33:33+5:30
पक्षीय प्राबल्य ठरणार निर्णायक
मनोज मालपाणी नाशिकरोड
येथील प्रभाग २० मध्ये शिवसेना, भाजपा या दोन पक्षांमध्येच सध्यातरी लढत होण्याची चिन्हे आहेत. तर दोन ठिकाणी मनसेचे उमेदवारदेखील चमत्कार घडविण्याच्या तयारीत आहेत. काही अपक्षांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना मिळणाऱ्या मतांचे गणित समीकरण बदलणारे ठरू शकते. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निवडणुकीतून बाहेर पडली आहे.
नाशिक-पुणे महामार्गाच्या उपनगर नाका ते बिटको पॉइंटपर्यंत दुतर्फा नवीन प्रभाग २० ची व्याप्ती आहे. उमेदवारी निश्चित करताना शिवसेनेला जास्त रोष सहन करावा लागला नाही. मात्र भाजपाला अनुसूचित जाती गटातील उमेदवारी निश्चित करताना जुने-नवीन असा वाद निर्माण झाल्याने अखेरीस जुन्या गटाला झुकते माप द्यावे लागले. तर मनसेला ब व क गटात उमेदवारच न मिळाल्याने त्यांचे पॅनल पूर्ण होऊ शकले नाही. कॉँग्रेसला सोडलेल्या दोन जागांवर त्यांनी वेळीच उमेदवार दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या दोन्ही उमेदवारांची माघार घेऊन या प्रभागातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.
‘अ’ अनुसूचित गटातून शिवसेना- अशोक पगारे, भाजपा- अंबादास पगारे, भाजपाने उमेदवारी नाकारल्याने मनसेकडून विकास पगारे, राष्ट्रवादीचा उशिरा एबी फॉर्म जमा केल्याने अपक्ष ठरलेले माजी नगरसेवक संजय अढांगळे, कॉँग्रेसचा एबी उशिरा दाखल करणारे अपक्ष अनिल बहोत, भारिप बहुजन महासंघाचे अरुण शेजवळ, शिवसेना बंडखोर रवीकिरण घोलप, अपक्ष प्रदीप बागुल, उदय भालेराव, संजय पगारे, तुषार दोंदे, नितीन पंडित हे १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या ठिकाणी पक्षीय ताकद महत्त्वाची भूमिका बजावेल असे सध्याचे चित्र आहे.
ब इतर मागासवर्ग महिला गटातून शिवसेनेकडून सुनीता श्रीराम गायकवाड व भाजपाकडून माजी नगरसेविका सीमा राजेंद्र ताजणे यांच्यात आमनेसामने लढत होणार आहे. जवळचे संबंध व मित्र कंपनीचा गोतावळा यामुळे दिवसेंदिवस या लढतीतील चुरस वाढू लागली आहे.
क सर्वसाधारण महिला गटातून भाजपाकडून नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड व शिवसेनेकडून योगिता किरण गायकवाड यांच्यात लढत होत आहे. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केलेली कामे हे त्यांचे भांडवल असून मळे विभागांतील संबंध ही योगिता गायकवाड यांच्या जमेची बाजू आहे.
‘ड’ गटातून भाजपाकडून नगरसेवक संभाजी मोरूस्कर, शिवसेनेकडून गिरीश मुदलियार, मनसेकडून विक्रम कदम, अपक्ष नितीन गुणवंत रिंगणात आहेत. मोरूस्कर गेल्या दहा वर्षापासून नगरसेवक असून, प्रभागातील कामांच्या जोरावर आणि भयमुक्त प्रभाग या मुद्द्यांवर ते मते मागणार आहेत. तर शिवसेनेचे गिरीश मुदलियार बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारांसमोर आले आहेत. सामाजिक उपक्रमाच्या जोरावर त्यांची मदार आहे. मनसेचे विक्रम कदम यांनी गेली निवडणूक लढविली होती. दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनी चांगली मोर्चेबांधणी केली आहे.