बाजार समितीच्या निधीचा दुरूपयोग केल्याचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:59+5:302021-04-07T04:15:59+5:30
नाशिक- येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निधीच्या दुरूपयोग प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे नाशिकच्या जिल्हा ...
नाशिक- येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निधीच्या दुरूपयोग प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकांनी जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार १ कोटी १६ लाख ५७ हजार रूपयांची वसुली सचिवासह ११ संचालकांकडून वसुल करण्यात येणार असून त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे यांचाही समावेश आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील या घोळामुळे आता येथील व्यवहार चर्चेत आले असून माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी या प्रकरणात सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर विद्यमान सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी चौकशी अहवाल अमान्य असून त्यासंदर्भात अगोदरच पणन संचालकांकडे अपिल केले आहे, असे स्पष्ट केले.
नाशिक बाजार समिती कोणत्या ना केाणत्या प्रकरणांमुळे चर्चेत असते. आता निधीच्या दुरूपयोगाचे प्रकरण चर्चेत आले आहे. कोरोना काळात संचालक मंडळाने अन्न धान्याचे केलेले वाटप आणि टोर्मटो मार्केटमधील भाडे वसुलीतील गोंधळ या प्रकरणी सहायक निबंधक माधव शिंदे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले हेाते. त्यांनी अहवाल सादर केला असून त्याच्या आधारे जिल्हा उपनिबंधक सतीश तारे यांनी एकुण १ कोटी १६ लाख ५७ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्या आधारे यांनी देवीदास पिंगळे, संपत सकाळे, युवराज कोठूळे, दिलीप थेटे, विश्वास नागरेे, तुकाराम पेखळे, सचिव अरूण काळे यांच्यासह अन्य संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश कलम ५७ (२) नुसार दिले आहेत.