नांदूरशिंगोटे येथे म्हाळोबा यात्रेत कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: February 23, 2016 11:06 PM2016-02-23T23:06:34+5:302016-02-23T23:30:53+5:30
दोडी : राज्यभरातील भाविकांची हजेरी
नांदूरशिंगोेटे : राज्यभरातील धनगर समाजाचे आराध्यदैवत म्हाळोबा महाराजांच्या तीन दिवसीय यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. मंगळवारी दिवसभरात सुमारे ८० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी सुमारे पंधराशे बोकडबळी देऊन नवसपूर्ती करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
परिसरातील जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या म्हाळोबा यात्रेचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून दोडी येथे आलेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दर्शन आणि बोकडबळीनंतर भाविकांनी यात्रेत थाटलेल्या विविध दुकानांमध्ये खरेदीचा आनंद लुटला.
नोकरी - व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक व माहेरवाशिणीही यात्रेसाठी गावात येत असल्याने एकमेकांशी गाठीभेटी होऊन यात्रेला स्रेहसंमेलनाचे स्वरुप आल्याचे दिसून आले. दुपारी कुस्त्यांची विराट दंगल झाली. त्यात १०० रुपयांपासून पंधराशे रुपयांपर्यंत विजेत्या मल्लांना बक्षिसे देण्यात आली.
येथे अनेक वर्षांची जाब लावण्याची प्रथा आजही टिकून आहे. रविवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावास्येला परिसरातील भाविकांची गर्दी असते.
भाविक जाब लावून नवस बोलतात व यात्रा काळात नवसपूर्ती केली जाते. त्यामुळे नवसपूर्तीसाठी मोठी गर्दी उसळली होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील कावडीधारकांनी आणलेल्या गंगाजलाची, देवाच्या मुखवट्याची व देवकाठ्यांची गावातून डफाच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीवर गंगाजलाचा अभिषेक घालण्यात आला. दुपारी होम-हवन, पूजा, आरती व नैवद्य दाखविण्यात आले़