क्रॉम्प्टनप्रकरणी ३0 रोजी सुनावणी
By admin | Published: June 19, 2015 12:09 AM2015-06-19T00:09:07+5:302015-06-19T00:12:06+5:30
क्रॉम्प्टनप्रकरणी ३0 रोजी सुनावणी
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीने संपकाळातही कामगार भरती केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल दाव्यावर येत्या ३0 रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सीटू नेते
डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत गेल्या चाळीस दिवसांपासून सीटू प्रणित युनियनच्या कामगारांनी संप पुकारलेला आहे. आयटक व सीटू युनियन या दोन्ही युनियनपैकी कंपनी व्यवस्थापनाने आयटक युनियनला मान्यताप्राप्त युनियन म्हणून वेतन वाढीचा करार केला आहे. यामुळे सीटूच्या कामगारांनी संप पुकारला असून, गेल्या ४0 दिवसांपासून हा संप सुरू आहे. या संप काळात कंपनी व्यवस्थापनाने नवीन कामगारांची भरती केल्याचे प्रकरण सीटूच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयात आज झालेल्या सुनावणी येत्या ३0 जून रोजी अंतिम निर्णय दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालय नेमके काय निर्णय देईल. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात डॉ. कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या चाळीस दिवसांपासून कामगारांनी संप पुकारलेला असून, यामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात
आहे.
कंपनी व्यवस्थापन समोरासमोर बैठक न लावता कार्यालयीन प्रक्रियेद्वारे दिवस ढकलत असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. कामगारांना गेल्या पंधरा वर्षांपासून बदलता महागाई भत्ता मिळत नाही. कामगारांना त्यांच्या पसंतीची युनियन निवडण्याचा अधिकार मिळणार की नाही हा प्रश्न आहे. डिसेंबर २0१५ रोजी कंपनीतील सुमारे ५00 कामगारांनी आयटक प्रणित युनियनचा राजीनामा दिला आहे.
यामुळे क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये सीटू युनियनच्या कामगारांची संख्या अधिक असताना कंपनी व्यवस्थापन हे आयटकबरोबर कसा काय करार करते असा प्रश्नही डॉ. कराड यांनी उपस्थित केला. कंपनी व्यवस्थापन व आयटक युनियन यांनी संगनमत करून स्वत:चे हितसंबंध जोपासण्यासाठी हा करार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. (वार्ताहर)