उमेदवार निवडण्यात पक्षश्रेष्ठींपुढे पेच

By admin | Published: April 7, 2017 11:46 PM2017-04-07T23:46:50+5:302017-04-07T23:47:08+5:30

मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत पूर्व भागात सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांमधून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू आहे

Crop fixation in favor of candidates | उमेदवार निवडण्यात पक्षश्रेष्ठींपुढे पेच

उमेदवार निवडण्यात पक्षश्रेष्ठींपुढे पेच

Next

 सय्यद रशीद आझादनगर
आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत पूर्व भागात सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांमधून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. उमेदवारी देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात पोहोचली आहे; तर काही चुरशीच्या प्रभागामध्ये कॉँग्रेस व एमआयएमने आपले उमेदवार निवडणूक तारीख जाहीर होण्याआधीच निश्चित करुन टाकले आहेत. यामुळे येत्या काही दिवसात नाराज उमेदवार ‘बंड’ करण्याची शक्यता आहे.
सर्व प्रथम बंडखोरीचे ‘ग्रहण’ नगरसेवक शकील अहमद जानीबेग यांच्या माध्यमातुन कॉँग्रेसला लागले आहे. यंदाची महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे. राकॉँचे माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना पराभवाचे धनी व्हावे लागल्याने येत्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ते महापालिकेची निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे माजी आमदार कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष शेख रशीद यांनी स्वत: महापौर पदासाठी आपले नाव जाहीर केले आहे. विद्यमान आमदार आसिफ शेख आपल्या वडीलांना महापौरपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी विधान सभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
खरी लढत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्येच होणार असल्याने प्रत्येक प्रभागात मागील काही महिन्यांपासून इच्छुकांसह प्रतिष्ठीत मान्यवरांवर दोन्ही पक्ष डोळे ठेवून त्यांना आपआपल्य पक्षातर्फे उमेदवारी करण्यासाठी साकडे घालत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहेत. अशा ठिकाणी नवख्या व जुन्या कार्यकर्त्यांचा सुरजुळवून घेण्यासाठी सर्वच पक्षनेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चार उमेदवारांचा प्रभाग झाल्याने मतदारांसह इच्छुकांची संख्याही वाढली. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांकडूनही अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे निवड समिती गठीत करुन निर्णयाची जबाबदारी समितीच्या खांद्यावर टाकण्यात येत आहे.
कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून एकमेकांना शहकाटशह देण्यासाठी कंबर कसली आहे. यात एमआयएम देखील स्पर्धेत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहा विद्यमान नगरसेवक कॉँग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यात एजाज उमर, मोहंमद सुलतान, युसुफ अब्दुल कादीर, नुरजहॉ मोहंमद मुस्तफा व धर्मा भामरे, नजीर अहमद यांचा समावेश असला तरी प्रत्यक्षात सहा पैकी तीन नगरसेवक हे तीन वर्षापासून कॉँग्रेस सोबतच आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक राहणार असल्याने बंडखोरीची शक्यता कमी आहे. यास फक्त विद्यमान स्थायी समिती सभापती एजाज बेग हे अपवाद आहे. त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका यास्मीन एजाज बेग अशा दोघांना पक्षाने उमेदवारी न दिल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेस पक्षाची परिस्थिती वेगळीच आहे. उमेदवारी देण्याबाबत पिता-पुत्र आजी-माजी आमदार शेख यांच्यामध्ये मतभेद असल्यामुळे सुमारे सहा महिन्यापूर्वी पासूनच मागील प्रभाग ४० च्या नगरसेविका शमशादबी शेख यासीन यांनी एमआयएमशी घरोबा केल्यामुळे पक्षास गळती लागली होती. त्यातच कॉँग्रेसमध्ये विद्यमान आमदार आसिफ शेख व माजी आमदार कॉँग्रेस शहराध्यक्ष रशीद शेख यांच्या समर्थकांचे दोन गट आहेत. त्यामुळे काही ठिकाणी आपल्या समर्थकांची वर्णी लागणार नाही म्हणून आमदार आसिफ शेख यांची कोंडी होत आहे. नगरसेवक अस्लम अन्सारी व शकील अहमद जानी बेग यांना डावलून त्यांच्या पत्नीस उमेदवारी देण्याची तयारी विनंतीअंती रशीद शेख यांनी दर्शविल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा मार्ग पत्कारला आहे. कॉँग्रेस पक्षाला बंडखोरीचा मोठा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. तशी कबुली आमदार शेख यांनी अनोपचारिकपणे दिली होती.
एमआयएम किती जागांवर निवडणूक लढणार हे अद्याप निश्चित नसले तरी एमआयएममुळे निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे. दिवंगत माजीमंत्री निहाल अहमद या निधनानंतर प्रथमच त्यांचे पुत्र बुलंद एकबाल यांना मनपा निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे. यामुळे या निवडणुकीत गतवेळेपेक्षा पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे. परंतु ते निवडणूक स्वबळावर न लढता राकॉँशी युती केली तर निहाल अहमद यांच्या तत्वांना तिलांजली देण्यासारखे ठरेल.

Web Title: Crop fixation in favor of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.