सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणीसाठी पीक कापणी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:56 PM2018-10-08T15:56:29+5:302018-10-08T15:58:02+5:30
सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली.
सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पीक कापणी प्रयोगाचे आदेश दिल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. १८ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरकरांनी मोर्चा काढला होता. दुष्काळी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने व दुष्काळाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी नांदगाव ,मालेगाव, सिन्नर तालुक्यात पीक कापणीचे प्रयोग तातडीने राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात जिल्हाधिकारी यांना दिले. माजी आमदार कोकाटे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री यांना म्हटले आहे की ,सिन्नर तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून प्रशासनाने शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करून उपाय योजना करण्याबाबत विनंती केली होती. पर्जन्यमानात ३ ते ४ आठवडे खंड पडल्याने ७५ % पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठलेही सर्वेक्षण अद्याप केले नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन पाच मागण्या कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. तालुक्यात चारा छावण्या, मागेल त्या गावाला पाणी टँकर, शेतपंपाची वीजबिल माफी, विद्यार्थ्यांची फी माफी, मार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर जिल्हा यंत्रणा गतिमान झाली आहे. सिन्नरसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिले आहेत. तालुक्यातील प्रत्येकी १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करत तिथे हे प्रयोग राबवण्यात येणार आहेत. सदर अहवाल शक्य तितक्या लवकर राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून, राज्य स्तरावर टंचाई घोषित करून त्याचा अहवाल केंद्राकडे मदतीसाठी सादर करीत मागणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.