जिल्ह्यातील ९१ शेतकऱ्यांचा पीक विमा
By Admin | Published: September 15, 2016 12:13 AM2016-09-15T00:13:59+5:302016-09-15T00:21:11+5:30
कृषी योजनांचा आढावा : तत्काळ रक्कम देण्याची सूचना
नाशिक : जिल्ह्यातील ९१ हजार ४६२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला असून, विमा कंपन्यांनी कृषी संबंधित विम्याच्या रकमा शेतकरी कुटुंबाना तत्काळ द्याव्यात, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केली आहे.
कृषी विभागांतर्गंत विविध योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत जिल्ह्णातील ६७ शेतकरी कुटुंबीयांना विमा रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. विमा योजनेतील प्रस्ताव पाठवताना कागदपत्रांची पूर्तता करताना काळजी घेतली जावी, अपघात विमा योजनेतील परिपूर्ण प्रस्तावांवरील मंजुरी प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाते, अशी माहिती विमा कंपनीच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्णातील २९ हजार ९४२ बिगर कर्जदार व ६१ हजार ४७० कर्जदार अशा ९१ हजार ४६२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक टी. ए. जगताप यांनी दिली.
यावेळी कृषी विकासासंंबंधित अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, मृदू आयोग्य पत्रिका, सिंचन आराखडा, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आदि विषयांचीही चर्चा झाली.
बैठकीस रोहयो उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, जिल्हा पणन अधिकारी एस. एस. सोनवणे, महाराष्ट्र बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. चव्हाण, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. पी. चोपडे आदि अधिकारी उपस्थित होते.