पीकविमा काढणाऱ्यांना अद्याप भरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:32 PM2020-01-27T23:32:09+5:302020-01-28T00:25:19+5:30
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या सप्टेंबर,आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, द्राक्ष, लाल कांदा, कांदा रोप, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ज्या शेतकºयांच्या कांदा रोपांचे नुकसान झाले त्यांनी पुन्हा रोप टाकले पण त्याचेही नुकसान झाल्याने ऐन हंगामात शेतकºयांना कांदा रोप मिळविण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ आली.
सोंगणी केलेल्या मकाच्या कणसांना कोंब फुटल्याने मकाचे उत्पादन कमी झाले. लष्करी अळीच्या आक्रमणापासून शेतकºयांनी मोठ्या हिमतीने मका पीक वाचविले, मात्र नंतर ते पावसाच्या सपाट्यात सापडल्यामुळे अनेक शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले.
झालेल्या नुकसानीची शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागल्यानंतर राज्य शासनाने महसूल विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी गावोगावी जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. त्यानंतर राज्य शासनाने खरीप पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी आठ हजार तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्य शासनाने अनुदान देण्यास सुरुवात केली असून अनेक शेतकºयांच्या बॅँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल की नाही याबाबत गावागावातील शेतकºयांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्यांनी पीकविमा केला नाही त्यांना पैसे मिळाले मात्र ज्यांनी अडचणीच्या काळातही पीक विम्याचा हप्ता भरला त्यांना मात्र अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे.
फेब्रुवारीअखेर कार्यवाही होण्याची शक्यता
पंचनामे करताना ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला आहे त्यांचे क्षेत्र वगळण्यात आले होते. या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ज्यांनी विमा उतरविला आहे त्यांना अद्याप नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई केव्हा मिळेल याची कृषी विभागाला निश्चित माहिती नाही. याबाबत फेब्रुवारीअखेर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.