ओखी वादळाचा तडाखा : पावसामुळे नाशिकमधील कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 10:20 AM2017-12-06T10:20:26+5:302017-12-06T10:25:21+5:30
ओखी चक्री वादळाच्या तडाख्यामुळे सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
सायखेडा (नाशिक) - ओखी चक्री वादळाच्या तडाख्यामुळे सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्ष मान्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे तर उशीरा द्राक्ष हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांचा बाग फुलो-यामध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भेंडाळी, महाजनपुर, औरंगपूर परिसरात लाल कांदा काढणीला वेग आला आहे, कमी पाणी, मुरमाड जमीन यामुळे या भागात लाल कांदा लागवड जुलै, ऑगस्ट महिन्यात केली जात असते. या भागातील कांदा काढणीला वेग आला असताना अस्मानी संकटामुळे शेतात काढून पडलेला कांदा आणि काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे.
पावसाचे पाणी लागल्यामुळे कांदा खराब झाला आहे. शेतातच कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. सलग तीन वर्षे बेभाव विक्री केलेल्या कांद्याला यंदा दोन पैसे मिळतील, अशी परिस्थिती असताना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.