डोंगरगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:09 PM2020-07-26T15:09:06+5:302020-07-26T15:10:14+5:30
मेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसरात झालेल्या सलग दोन तीन दिवसांच्या पावसाने हाहाकार केला असुन खरीप पिकांसह कोबी, टोमॅटोचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसरात झालेल्या सलग दोन तीन दिवसांच्या पावसाने हाहाकार केला असुन खरीप पिकांसह कोबी, टोमॅटोचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
डोंगरगाव येथील गोकुळ सावंत, चिंतामण सावंत यांच्यासह अनेक शेतकरी यांच्या शेतातील बाजरी, मका आणि भुईमूग आदी पिकांमध्ये गुढघाभर पाणी साचल्याने पिके खराब झाली आहेत. याशिवाय मेशी येथील भिका शिरसाठ यांच्या टोमॅटो व कोबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सलग दोन तीन वेळा झालेल्या या ढगफुटीसारख्या मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच कांदा चाळीत पाणी घुसले आहे.
या पावसाने सगळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. या वर्षी अगदी जूनच्या आरंभापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीपाची पेरणी लवकर आटोपली होती, परिणामी पिके जोमात आहेत. परंतु या सगळ्या आनंदावर विरझण पसरेल कि काय असे चित्र निर्माण झाले आहे. काही पिके पावसाच्या पाण्याने उन्मळून गेली आहेत. त्यामुळे खरीप पिके वाया जाण्याची शक्यता आहे.
महसूल विभागाने दखल घेऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
ओढे, नाल्यांचेही पाणी उभ्या पिकांमध्ये घुसले असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके सडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. अजूनही पावसाचे वातावरण आहेच त्यामुळे पावसाळी कांदा लागवडही लांबणीवर पडू लागली आहे, त्यामुळे कांद्याची रोपे खराब होत आहेत. चोहोबाजुंनी शेतकरी कोंडीत सापडला आहे. महागडी बियाणांची खरेदी करून पेरणी केली आहे. तसेच महागडी खते वापरली गेली आहेत यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.