पाटोदा परिसरात पिके तरारली
By admin | Published: September 17, 2016 12:06 AM2016-09-17T00:06:34+5:302016-09-17T00:06:44+5:30
येवला तालुका : सर्वदूर पाऊस, उत्तरा नक्षत्राने बळीराजा सुखावला
पाटोदा : दिड महिन्यापासून दडी दिलेला पाऊस अनंत चतुर्दशीला सक्र ीय झाल्याने येवला तालुक्यात खरीप हंगामातील पिके तरारून आली आहे. उत्तरा नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने जोरदार प्रारंभ केल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे.
आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने बाजरी, मका, सोयाबीन पिके सुकू लागली होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो कि काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. विहिरीच्या पाण्यावर तसेच पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी कालव्याच्या पाण्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र वीज वितरण कंपनीने पूर्व सूचना न देता आठ दिवस दिवसा व आठ दिवस रात्रीचे भारिनयमन सुरु केल्याने पाणी असूनही ते पिकांना देता येत नव्हते. त्यामळे शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे भारिनयमन करावे अशी मागणी केली होती. परंतु अधिकारी वर्गाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी का होईना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. गेल्या चार पाच वर्षापासून तालुक्यात दुष्काळ पडत आहे.
यावर्षी खरीपाची पिके बहरली होती. परंतु दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके पाण्याआभावी कोमेजली होती. यावर्षीही खरीपाची पिके पाण्याआभावी वाया जातात कि काय अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत असतांना पावसाचे आगमन सुखावत आहे. (वार्ताहर)