नाशिकमध्ये आमदार कन्येच्या पंचतारांकित विवाहाला वऱ्हाडींची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:22 AM2021-07-02T07:22:22+5:302021-07-02T07:22:44+5:30

कोरोना नियमांचे उल्लंघन; अजित पवारांकडूनही कबुली

Crowd of brides at the five-star wedding of MLA's daughter in Nashik | नाशिकमध्ये आमदार कन्येच्या पंचतारांकित विवाहाला वऱ्हाडींची गर्दी

नाशिकमध्ये आमदार कन्येच्या पंचतारांकित विवाहाला वऱ्हाडींची गर्दी

Next

नाशिक : राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांचा विवाह साध्या नोंदणी पद्धतीने व मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत करण्याचे जाहीर करून प्रत्यक्षात मात्र हा सोहळा लक्ष वेधून घेणारा पंचतारांकित व्यवस्थेत पार पडला. या विवाहानिमित्त खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार मंत्री, आमदार, खासदारांसह शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचे उघड-उघड उल्लंघन करण्यात आले.

शासनातीलच मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधीच्या कन्येच्या विवाह सोहळा पार पाडला जात असताना या सोहळ्यात आवर्जून उपस्थित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनीही गर्दीकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतली. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याची अप्रत्यक्ष कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देतानाच लोकप्रतिनिधींच्या चुकांबद्दल सारवासारव करताना त्याचे खापर प्रसिद्धी माध्यमांवर फोडण्याचाही प्रयत्न केला. मतदारसंघातील समर्थक, कार्यकर्त्यांची गर्दी टाळण्यासाठी सदरचा विवाह सोहळा गंगापूर धरणानजीकच्या एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये गुरुवारी दुपारी करण्यात आला. भव्य शामियाना, आकर्षक सजावट व येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे केले जाणारे स्वागत पाहता, या सोहळ्यात कोरोनाच्या प्रत्येक नियमांचे उल्लंघन करण्यात आले.

बंधने पाळण्याचा प्रयत्न केला
आमच्या प्रेमापोटी राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधींनी गर्दी केली असली तरी, कोरोनाचे सर्व बंधने पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. मात्र काहींनी त्याचे उल्लंघन केले, मास्क वापरले नाहीत हे नाकारून चालणार नाही.
- माणिकराव कोकाटे, आमदार

कोरोना नियमांतून कोणालाच सूट नाही
लग्न साेहळ्यात आपल्यासमोर साऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन केले होते. आपल्यानंतर कोरोना नियमांचे पालन झाले नसेल तर ते चुकीचेच आहे. कोणालाच कोरोना नियमांतून सूट देण्यात आलेली नाही. पुण्यात माझ्या कार्यक्रमात गर्दी झाली तेव्हा गुन्हे दाखल झालेच आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Crowd of brides at the five-star wedding of MLA's daughter in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.