नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 01:04 PM2017-09-22T13:04:10+5:302017-09-22T13:07:01+5:30

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रृंगीमातेच्या सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या दिवशी (22 सप्टेंबर) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

The crowd of devotees for the festival of Saptashrungi in Nashik | नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next

वणी (नाशिक), दि. 22 - उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रृंगीमातेच्या सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रौत्सवाचा आजचा दुसरा दिवस. मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी याठिकाणी झाली आहे.  गुरुवारी (21 सप्टेंबर) पहिल्याच दिवशी सुमारे 40  हजार देवीभक्त दर्शन घेऊन नतमस्तक झालेत. शुक्रवारी सकाळी देवीची महापूजा खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली.

प्रवेशद्वाराजवळ न्यासाने नारळ फोडण्यासाठी व अर्पण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असून मेटल डिटेक्टरमधून तपासणी करून भाविकांना मंदिरात सोडण्यात येत आहे. देवीभक्तांना सहज-सुलभ दर्शन व्हावे यासाठी न्यासाने ठिकठिकाणी एलईडीद्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.  शिवाय, प्रसादालयात देवीभक्तांना मोफत महाप्रसाद व फराळाची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असून अन्नपूर्णा प्रसादालयात आज हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  प्रसादाचं लाभ घेण्याचे आवाहनच न्यासाने केले आहे.

दर्शनासाठी गर्दी वाढत असल्याने बंदोबस्ताचा ताण पोलीस यंत्रणेवर पडत असून पोलिसांच्या रोषाला देवीभक्तांना सामोरे जावे लागत आहे . संपूर्ण गडावर ‘सप्तश्रृंगी माता की जय , बोल आंबे की जय’चा जयघोष होत असून गड व परिसरात भक्तिमय वातावरण आहे. कळवणचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी सप्तश्रृंग गडावर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
चोख बंदोबस्त
नवरात्र उत्सव कालावधीत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 उपअधीक्षक, 10 निरीक्षक, 15 उपनिरीक्षक, 200 कर्मचारी, 50 महिला पोलीस कर्मचारी, 250  होमगार्ड, एसआरपीएफ टीम तैनात करण्यात आली आहे. शिवालय तलाव येथे जीवरक्षक, खासगी रक्षक,तसेच अग्निशमन दलाची दोन बंबांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
 
मंदिर २४ तास राहणार खुले
भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी उत्सव कालवधीत मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर व प्रवेश द्वाराजवळ क्लोज सर्किट टीव्ही बसवण्यात आले आहेत. तसंच यात्रा काळात परिसर साफसफाई करता सफाई कर्मचा-यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवालय तलावावरदेखील प्रथमच कॅमेरे बसवण्यात आलेत. उत्सव काळात रोगाची साथ पसरू नये याकरता वैद्यकीय अधिका-यांसह पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गडावरील मुख्य चौक, पहिली पायरी , मंदिर , परतीच्या पायरी आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली
 
सप्तंशृग गडावर प्लॅस्टिक बंदी 
सप्तंशृग गड व परिसरातील प्लॅस्टिक बंदीबाबत आपली भूमिका प्रशासनाने अनेकवेळा स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार गड व नांदुरी ग्रामपंचायत यंत्रणेसह देवस्थानचे कर्मचारी यांनी सतर्क राहून प्रबोधन करावे व पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत. वेळप्रसंगी याबाबत गैरकृत्य करणा-यांवर ग्रामपंचायत ने कारवाई करावी,अशी सूचनाही करण्यात आली आहे.

 

सप्तशृंगी निवासिनी देवीचे आजचे (  22 सप्टेंबर)  मुखदर्शन.

आजची भगवतीची पंचामृत महापूजा खासदार हेमंत गोडसे व जिल्हा परिषद सदस्य श्री नितीन व सौ जयश्री पवार यांनी केली. यावेळी देवीची दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजा करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी वाबळे उपस्थित होते.

                       

Web Title: The crowd of devotees for the festival of Saptashrungi in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.