जगदंबा देवी मंदिरात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 02:12 PM2018-10-13T14:12:37+5:302018-10-13T14:12:47+5:30
वणी : ललिता पंचमी व सुटीचा दिवस याचा सुवर्णमध्य साधत आज शनिवारी हजारो भाविक जगदंबेचरणी नतमस्तक झाले.
वणी : ललिता पंचमी व सुटीचा दिवस याचा सुवर्णमध्य साधत आज शनिवारी हजारो भाविक जगदंबेचरणी नतमस्तक झाले. जगदंबा देवी मंदिरात सध्या नवरात्र उत्सव सुरू असुन सप्तशृंगी देवीची जेष्ठ भगिनी म्हणुन जगदंबा देवीचा परिचय आहे. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर वणीच्या जगदंबेचे दर्शन घेतले तर यात्रा सफल होते अशी भाविकांची भावना आहे. शनिवारी ललित पंचमी निमति जगदंबेची विशेष सजावट करण्यात आली होती. शिरावर फुलांच्या वेण्या, कपाळावर चंद्रकोर , सौभाग्य लेण्याचे प्रतिक शेंदुर-लेपनाचा तेजपुंज चेहरा, नाकात नथ, तोंडात विडा, गळ्यात चांदीच्या नागलीच्या पानाच्या आकाराचा हार, मंगळसुत्र, सुवर्णहार अशा विविध प्रकारच्या फुलांचे हार कर्णकुले आकर्षक पैठणी मुर्तीच्या दोन्ही बाजुस सजावट केलेले उस व पाने यामुळे भगवतीचे रूप खुलुन दिसत होते. दर्शनासाठी पंचक्र ोशीतील भाविकांनी सकाळपासुन भाविकांनी गर्दी केली आहे. याबरोबर नवसपूर्तीसाठी घटी बसलेल्या महिला जगदंबेचा जयघोष करत पदयात्रा करणारे भाविक व पूजाविधी व आरतीसाठी सर्व समाजाची प्रतिनिधीक स्वरूपात हजेरी यामुळे वणी शहरात सध्या मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. नवरात्र उत्सवाच्या अंतिम सत्रात भाविकांच्या हजेरीत वाढ होणार आहे. दर्शन सुलभ व्हावे याकरिता जगदंबा देवी संस्थानच्या कार्यकारी मंडळाने नियोजन केले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी दिली.