गजानन महाराज प्रकटदिनी पंपा सरोवरला भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 07:54 PM2021-03-05T19:54:03+5:302021-03-06T00:37:49+5:30
इगतपुरी : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर येथील श्री गजानन महाराजांची तपोभूमी असलेला मंदिर परिसर माउलींच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खुलून गेला होता. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रींच्या तपोभूमीचे दर्शन घेतले.
तपोभूमीचे प्रवेशद्वार, मंदिर परिसर आवार, दर्शनस्थळ, प्रसादालय, आदी ठिकाणी पावलोपावली हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येऊन तोंडावर मास्क असलेल्या प्रत्येक भाविकांची टेम्परेचर गनद्वारे तपासणी करण्यात येऊन प्रवेश दिला जात होता. शासन नियमानुसार दहा वर्षांखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास प्रवेश दिला जात नाही. मंदिर परिसरातही दोन भाविकांत सहा फुटांचे अंतर ठेवले जात आहे. तसेच स्वच्छता व मौन आचरणाला प्राधान्य दिले जात आहे. प्रसादालयास्थळी पूर्णत: फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात होते. प्लास्टिकमुक्त अभियानावर भर दिला जात आहे. या तपोभूमीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडूनही संस्थांच्या नियमांचे पालन केले असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असून, प्रत्येक सेवेकरी चेहऱ्यावर फेसशिल्ड, मास्क व हँडग्लोव्हज वापरूनच भाविकांच्या सेवेत कार्यरत आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे तपोभूमी आवार व परिसराचे प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुकीकरण केले जात असून, संस्थानच्या वतीने सर्वच बाबतींत काळजी घेतली जात आहे.