मतदार नोंदणीसाठी अखेरच्या दिवशी गर्दी
By admin | Published: October 15, 2016 01:57 AM2016-10-15T01:57:56+5:302016-10-15T02:02:51+5:30
मतदार नोंदणीसाठी अखेरच्या दिवशी गर्दी
नाशिक : मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदार नोंदणीसाठी शुक्रवारी अखेरचा दिवस असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांनी केंद्रांवर अक्षरश: रांगा लावल्या. दिवसभरातून सुमारे दहा ते बारा हजार मतदारांनी नावे नोंदविल्याचा अंदाज निवडणूक शाखेने व्यक्त केला असून, दोन दिवसांत निश्चित आकडेवारी समजू शकेल.
१६ नोव्हेंबरपासून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्या मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ज्यांची नावे यादीत नसतील, त्यांना नव्याने नोंदणीची संधी या मोहिमेद्वारे मिळाली. याशिवाय नाव, पत्त्यात बदल, मतदार संघाचे स्थलांतर, दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यालाही त्यात प्राधान्य देण्यात आले. शुक्रवारपर्यंत नाव नोंदविणाऱ्या सर्व मतदारांची अंतिम मतदार यादी डिसेंबर अखेर प्रसिद्ध करण्यात येणार असून, या मतदार यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात नगरपालिका तर जानेवारी, फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनीच आपल्या हक्काचे मतदान नोंदवून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने शुक्रवारी अखेरच्या दिवशी मतदारांनी मतदान नोंदणी केंद्रांवर गर्दी केली. गुरुवार अखेर जिल्ह्यात २९,६६५ इतक्या नवीन मतदारांची नोंद झाली. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील चारही विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे.