सप्तशृंगी गडावर दिवाळीमुळे भाविकांची गर्दी
By प्रसाद गो.जोशी | Published: November 14, 2023 05:44 PM2023-11-14T17:44:27+5:302023-11-14T17:45:07+5:30
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय व बँकांना आज सुट्टी असल्याने सप्तशृंगी गडावर तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दिवाळी पाडव्याचा मुहूर्त तसेच मंगळवार व दिवाळी सुट्टीची पर्वणी साधत हजारो भाविकांनी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय व बँकांना आज सुट्टी असल्याने सप्तशृंगी गडावर तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे सप्तशृंगी गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, जळगाव, उत्तर प्रदेश, धुळे, नंदुरबार या ठिकाणच्या भाविकांचा महापूर पाहावयास मिळत आहे. फनिक्यूलर ट्राॅलीचा आनंद घेण्यासाठी आबाल वृद्धांनी गर्दी केली आहे फनिक्यूलर ट्राॅलीत बसून दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तेथेही चार ते पाच तास वेटिंग असल्याने भाविकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळाला त्यामुळे भाविकांनी पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेण्याचे निर्णय घेतला.
परंतु पहिल्या पायरीजवळील भाविकांची गर्दी पाहून काही भाविक पहिल्या पायरीचे दर्शन घेत माघारी फिरले.