शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी
By admin | Published: June 15, 2014 01:40 AM2014-06-15T01:40:19+5:302014-06-15T18:27:03+5:30
शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी
नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या संपून आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही शाळेचे वेध लागले असून, वह्या-पुस्तके, दप्तरे, रेनकोट, गणवेश अशा सगळ्याच वस्तूंच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात वह्यांच्या किमती वाढल्या असल्या, तरी बजेटनुसार त्या खरेदी करण्याकडे पालकवर्गाचा कल आहे.जून महिना सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. त्यामुळे मेनरोड, मुंदडा मार्केट, रविवार कारंजा, टिळकपथ, शालिमार यांसह उपनगरांतील दुकाने सध्या शालेय साहित्याने भरली आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारच्या, लहानग्यांना आकर्षित करणाऱ्या अशा वह्या उपलब्ध असून, अगदी दहा रुपयांपासून दीडशे- दोनशे रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडूंचे फोटो, अभिनेता व अभिनेत्री यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा पाठ्यपुस्तकांच्या किमतीत थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच रेनकोट, छत्र्या, सँडलच्या किमतीही वाढल्याचेच चित्र आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स इत्यादिंनी दुकाने सजली आहेत. महागाई वाढली असली, तरी प्रत्येक पालकाच्या बजेटनुसार शालेय साहित्य उपलब्ध असल्याचे दुकानदार आशिष मेहता यांनी सांगितले.
ब्रँडेड कंपन्यांच्या वह्या, रजिस्टर बाजारात दाखल झाले आहेत. यासंदर्भात एका वही विक्रेत्याने सांगितले की, वह्या-पुस्तकांच्या विक्रीत अधिक उलाढाल होते. प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी एक डझन वह्या खरेदी कराव्याच लागतात. राज्य शासनाच्या वतीने अभ्यासक्रमांची पुस्तके मोफत दिली जातात; पण खासगी शाळा, खासगी प्रकाशकांची पुस्तके आणण्यास सांगत असल्याने खासगी प्रकाशकांनी तयार केलेली अभ्यासक्रमांची पुस्तकेही दाखल झाली आहेत. (प्रतिनिधी)