मद्यालयांसमोरील तळीरामांची गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:07 PM2020-05-20T22:07:01+5:302020-05-20T23:58:41+5:30
सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.
सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या संकटात दारू दुकाने उघडण्यास शासनाने बंदी घातली होती. दारूच्या आहारी गेलेल्यांना कधी एकदा दारु मिळेल असे झाले होते. त्याबाबत समाज माध्यमांतून चर्चाही सुरू झाली होती. सर्वच बाजंूनी ही चर्चा सुरू झाल्यांनतर मोठा महसूल बुडत असल्याचा साक्षात्कार शासनाला झाला आणि दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पहिल्या दिवशी तळीरामांनी तुडुंब गर्दी केल्याने पोलीसाना हस्तक्षेप करीत ही दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, त्यानंतर शासनाने काही बंधने लादत पुन्हा दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. दुकानासमोर बॅरिकेट्स लावणे, ग्राहकांना सावलीत उभे राहता यावे यासाठी मांडव टाकणे, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, सॅनिटायझरने हात धूणे यासह सर्व बाबींची दुकानदारांनी व्यवस्था केली. त्यानंतरही दुकानात एकदम गर्दी होऊ नये म्हणून दुकानाबाहेर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उभे केले. टोकन नंबर देऊन एका-एका ग्राहकाला माल देण्याची व्यवस्था करण्यात आली.
रस्त्यावर होणारी ग्राहकांची गर्दी हुसकावण्यासाठी पोलीसांची नियुक्ती करण्यात आली. दुकानाबाहेर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी थांबले याचा अर्थ दुकाने २-३ दिवसच उघडतील असा कयास बांधून अनेकांनी महिना-दोन महिना पुरेल एवढी दारू खरेदी केली. अनेकांनी दारूच्या खंब्यांचे बॉक्सच्या बॉक्स उचलून नेले. मात्र, त्यानंतर प्रत्येक ग्राहकाला दोनच खंबे देणे सुरू झाले. विक्रेता दिवसभरात जास्तीत जास्त ४०० ग्राहकांनाच मद्य विकू शकेल, असे बंधन घातले गेले. दुकानांची वेळ १० ते ५ असताना साडेतीनलाच अपेक्षित ग्राहक झाल्याने दुकान बंद करण्याची वेळ विक्रेत्यांवर येत होती. मात्र, ३-४ दिवसांनतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
-------------------------------------------------------
शहरातील तीनही दुकानांसमोर दिसणारी ग्राहकांची रांग बंद झाली आहे. त्यामुळे दुकानासमारील मंडप गायब झाले आहेत. दुकानासमोरील गर्दी आवरण्यासाठी विक्रेत्यांना जादा माणसे कामावर ठेवावी लागली होती. त्यांचे कामही कमी झाले आहे. सकाळी १० वाजेला दुकान उघडल्यापासून दिवसभरात शंभर ग्राहकही येत नसल्याने विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. जादा विक्री होईल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेला माल दुकानात पडून आहे. तथापि तळीरामांनी घरातच साठा करून ठेवल्याने त्यांना म्हणावा असा उठाव नसल्याने चांगल्या ‘कमाई’चे स्वप्न धुळीस मिळाले आहे.