NCPचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात गर्दी, अजितदादा, भुजबळांसमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 10:38 PM2021-01-03T22:38:11+5:302021-01-03T22:51:45+5:30
Nashik News : कोरोनाच्या संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने विवाह सोहळे, तसेच इतर कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक - कोरोनाच्या संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने विवाह सोहळे, तसेच इतर कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाच या नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्याला कार्यकर्ते आणि वऱ्हाड्यांची मोठी झाली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाले.
या विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. दिलीप बनकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला वऱ्हाड्यांसह राज्य सरकारमधील मंत्री, आमदार तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला.
दरम्यान, या विवाह सोहळ्यात झालेल्या सोशल डिस्टंसिंगच्या उल्लंघनावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. ज्यांनी कायद्याचे पालन करायचे असते त्यांनीच कायद्याचे उल्लंघन केले तर सर्वसामान्यांनी कायद्याचे पालन करताना कोणाचा आदर्श ठेवायचा असा सवाल, दरेकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा विवाह पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये झाला होता. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने टीका झाली होती. या लग्नाला पाहुण्यांची अलोट गर्दी झाली होती. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. सामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना व नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना आमदारांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत होता.