खरेदीसाठी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:42 AM2019-10-21T01:42:11+5:302019-10-21T01:42:53+5:30
शहरातील नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीसह दिवाळ सणाचाही उत्साह संचारल्याचे दिसून येत असून, दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
नाशिक : शहरातील नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीसह दिवाळ सणाचाही उत्साह संचारल्याचे दिसून येत असून, दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
दिवाळ सण तोंडावर आल्याने नाशिककरांनी रविवारी (दि.२१) साप्ताहिक सुटीची संधी साधून मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, कॉलेजरोड परिसरात गर्दी केली. तसेच शहरातील विविध शोरूम्स आणि मॉलमध्येही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिकांनी वेगवेगळ्या आॅफर्स जाहीर केल्या असून कपडे, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्यापारी वर्षभरातील या मोठ्या सणासाठी ग्राहकांच्या स्वागतासाठी तयार आहेत.
प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी भारतीय संस्कृतीत देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे अशा सर्व वस्तूंनी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे दसऱ्यापासूनच विक्रेते नवनवीन वस्तू बाजारपेठेमध्ये आणत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यंदाही हे चित्र बाजारात दिसून येत असून, रविवारी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात खर्दी केल्याने बाजारपेठेत चैतन्य संचारल्याचे दिसून आले. कापड बाजारापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते वेगवेगळ्या आॅफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा
प्रयत्न करीत आहेत. कापडबाजारात ग्राहकांकडून मुख्यत: रेडिमेड कपड्यांना मोठी पसंती दिली जात आहे.
मेनरोड ग्राहकांच्या गर्दीने बहरले
नाशिककरांनी रविवारच्या साप्ताहिक सुटीची संधी साधत दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटला. विशेषत: खरेदीसाठी मेनरोडवर गर्दी झाली होती. दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाºया वस्तूंनी ग्राहकांना आकर्षित केले. तर साड्यांच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे.