लॉकडाऊननंतर शहरातील रस्त्यांवरील गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:58+5:302021-05-27T04:15:58+5:30
नाशिक : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गेल्या सोमवारपासून झालेली गर्दी कायम असून शहरातील रस्त्यावरील वर्दळ वाढली असल्याचे चित्र दिसत ...
नाशिक : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गेल्या सोमवारपासून झालेली गर्दी कायम असून शहरातील रस्त्यावरील वर्दळ वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी चारचाकी वाहनचालकांची विचारपूस केली जात असून विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट केली जात आहे.
जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवारी (दि. २४) संपुष्टात येताच रस्त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकीस्वारांची बेफिकिरी दिसून आली. निर्बंधातून सुटका मिळाल्यामुळे अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडले. तीन दिवसांपासून शहरात दिसणारे चित्र अजूनही कायम असल्याने कोरोना नियंत्रणात आल्यानंतरही नागरिकांची बेफिकिरी चिंता वाढविणारी ठरत आहे.
शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या रविवार कारंजा, एम.जी. रोड, शरणपूर रोड, गंगापूर रोड त्याच प्रमाणे पंचवटी, नाशिक रोड, सिडको, सातपूरला गर्दी वाढतच असल्याचे दिसते. सकाळी ७ ते ११ अशी दुकानांची वेळ असतानाही त्यानंतरही दिवसभर वाहनधारकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे.
भाजीपाला विकत घेणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी होत असून, भाजीबाजाराची ठिकाणे गर्दीने भरगच्च झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्वांत हॉटस्पॉट ठरलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश झाला होता. असे असतानाही जिल्ह्यातील अर्थचक्र सुरू राहावे म्हणून नागरिकांना संयम राखण्याबरोबरच नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. मात्र शिथिलतेचा गैरफायदा घेत नागरिक बाजारांमध्ये गर्दी करीत असल्यामुळे अशा नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनाही उपाययोजना कराव्या लागत आहेत.
(फोटो डेस्कॅन ९१ )
===Photopath===
260521\26nsk_49_26052021_13.jpg
===Caption===
सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे वाहनधारकांची तपासणी करतांना पोलीस