निर्बंध असतानाही बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:11+5:302021-05-08T04:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात संचारबंदी लागू असतानाही विविध बँकांच्या शाखांमध्ये मात्र ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात संचारबंदी लागू असतानाही विविध बँकांच्या शाखांमध्ये मात्र ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. बँका व विविध वित्तीय संस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे बँकांचे व्यवहार सुरू असल्याने नागरिक बँकांमध्ये गर्दी करून पैसे काढण्यासाठी रांगा लावत आहेत. यात पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
---
दुकाने बंद, टपऱ्या सुरू
नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद असली तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक टपऱ्यांवर अवैधरीत्या गुटखा अथवा सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. काही पानटपरीधारक टपरीजवळ थांबून येणाऱ्या ग्राहकांना तंबाखू व अन्य अमली पदार्थांची विक्री करीत आहेत.
--
भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक : इंदिरानगर भागात भाजी विक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रथचक्र परिसर व अश्वमेध परिसरात भाजी विक्रेत्यांकडून मास्क आणि सॅनिटायझरसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
--
कर्ज हप्ते स्थगित करण्याची मागणी
नाशिक : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना गृहकर्जासह विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने बँकांना सूचना करून कर्ज हप्ते स्थगित करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
---
शहरात मास्कला मागणी वाढली
नाशिक : वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे मास्कला पुन्हा मागणी वाढली असून बदललेल्या जीवनशैलीचा मास्क अविभाज्य घटक झाला आहे. कोरोनाचा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक घातक ठरू लागल्याने अनेक डॉक्टरांकडूनही दोन मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात असल्यानेही मास्कला मागणी वाढली असून शहरात अनेक नागरिक दोन मास्क लावून घराबाहेर पडत आहेत.
--
इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव
नाशिक : इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे घरूनच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थांच्या ऑनलाइन शिक्षणातही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
--
शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढली
नाशिक : शहरातील बाजारपेठांमध्ये कोरोनामुळे ग्राहक व व्यावसायिकांसाठी निर्बंध कडक केले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील अनेक विक्रेत्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यवसायास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना काळात शहरात फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले असून प्रतिबंधित क्षेत्रातही हे विक्रेते व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
---
जगन्नाथ चौकात सिग्नल बसविण्याची मागणी
नाशिक : इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरील जगन्नाथ चौकात चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या चौकात सिग्नल बसविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. जगन्नाथ चौकात समर्थनगर व शरयूनगर तसेच इंदिरानगर व पाथर्डी गावाकडून येणारी वाहने समोरासमोर येऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
---
रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य
नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्री श्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्याची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
--
विविध प्रकारच्या फळांना वाढली मागणी
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक जण संत्र्यासह विविध प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करीत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात विविध फळांना मागणी वाढली आहे. यात संत्री, सफरचंद व किवीच्या फळांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पपई, पेरू व डाळिंबाच्या फळांनाही मागणी वाढली आहे.
--