संवाद मेळाव्यात लोटली गर्दी अन् फुटल्या काचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 01:14 AM2021-08-09T01:14:18+5:302021-08-09T01:16:30+5:30
खुटवडनगर भागातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे शनिवारी (दि.७) सायंकाळी युवा सेनेच्या वतीने युवा सेना संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली नसतानादेखील आयोजकांनी मोठ्या संख्येने गर्दी जमा केल्याप्रकरणी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह चौघा पदाधिकाऱ्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको : खुटवडनगर भागातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे शनिवारी (दि.७) सायंकाळी युवा सेनेच्या वतीने युवा सेना संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली नसतानादेखील आयोजकांनी मोठ्या संख्येने गर्दी जमा केल्याप्रकरणी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह चौघा पदाधिकाऱ्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर, बाळकृष्ण शिरसाट, जिल्हा सरचिटणीस गणेश बर्वे, रूपेश पालकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारलेली होती. परंतु असे असतानाही युवा सेना पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात गर्दी जमविली. यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे याठिकाणी आगमन होताच एकच गर्दी लोटली. यामुळे हॉलच्या काचादेखील फुटल्या होत्या. या मेळाव्याला एक हजाराहून अधिक युवा सेना कार्यकर्ते, महिला, पुरुष सहभागी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
कोरोना महामारीमुळे सार्वजनिकरीत्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातली आहे. याचा विसर सत्ताधारी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना पडला आणि त्यांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशही धुडकावून लावत मेळावा रेटून नेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अंबड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.