ई-पासेससाठी परप्रांतीयांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:18 PM2020-05-05T22:18:50+5:302020-05-05T23:18:56+5:30
सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते.
सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. तहसील कार्यालयात परवानगीचे पासेस मिळतील, असा या परप्रांतीय कामगारांचा समज झाला.
तहसीलदार राहुल कोताडे यांनी या मजुरांना आॅनलाइन अर्ज भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ही प्रक्रि या पूर्ण केल्यानंतर दहा ते बारा दिवसांनंतर पासेस प्राप्त होतील, असे ते म्हणाले. त्यानंतर परप्रांतीयांची गर्दी कमी झाली. दरम्यान, सिन्नर तालुका रेड झोनमध्ये असल्याने पासेस मिळतील का नाही, याबाबत नक्की माहिती समजू शकत नाही. शासनाच्या नियमानुसार पासेसचे सर्व काम चालणार आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळपासून घराकडे परतण्याच्या ओढीने पासेस मिळविण्यासाठी परप्रांतीय मजूर उपाशीपोटी आणि तहानेने व्याकूळ होऊन बसलेले दिसत होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते योगेश घोरपडे व शंकर बोडके यांनी स्वखर्चाने परप्रांतीयांना बिस्किटे व पाण्याची व्यवस्था केली होती.